Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:50 PM | 4 comments

एकादशी आणि पंढरीची वारी

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग


Pandurang, Vitthal
पांडुरंग
कादशी जस-जशी जवळ येते तस-तशी संत चोखामेळा ह्यांच्या अभंगातील ह्या ओव्या नकळतच मुखी येतात. एका वर्षात जवळपास २४ एकादशी येतात, पण अधिक मास असणार्‍या वर्षात २६ एकादशी येतात. वैदिक हिंदु धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे; आणि ‘आषाढी’ आणि ‘कार्तिकी’ एकादशी म्हणजे वारकर्‍यांसाठी जणू आनंदाची पर्वणीच... भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठाविस युगं भगवान महाविष्णुचा नववा अवतार असणारा ‘पांडुरंग’ कटीवर हात  ठेऊन पंढरपुरी, चंद्रभागेतीरी उभा आहे. वारकरी आषाढी , कार्तिकी पंढरपुरी वारी करतात.


‘देवशयनी आषाढी एकादशी’ ते ‘प्रबोधिनी कार्तिकी एकादशी’ ह्या दरम्यानच्या पवित्र काळाला ‘चार्तुमास’ असे मानले जाते. प्राचिन हिंदु ग्रंथांतील संदर्भाप्रमाणे ‘भगवान महाविष्णु’ योगनिद्रेत जातात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी आणि भगवान महाविष्णु योगनिद्रेतून पुन्हा जागे होतात म्हणजेच त्यांना प्रबोध केले जाते तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. म्हणुनच ह्या ‘कार्तिकीला’ अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या चार्तुमासात धार्मिक वृत्तीची अनेक माणसे व्रत करतात.


अशी आख्यायिका आहे की, विजयनगरचा राजा ‘कृष्णदेवराय’ ह्यांनी पंढरपुरातुन विजयनगरला नेलेली विठुरायाची मुर्ती ‘संत भानुदास महाराज’ (संत एकनाथ महाराजांचे पणजोबा) ह्यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पुन्हा पंढरपुरात आणली. आणि पुन्हा एकदा कार्तिकीच्या उत्सवाला पंढरपुरात सुरुवात झाली.


Chandrabhaga Snan, Chandrabhaga
पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला झालेली वारकर्‍यांची गर्दी आणि चंद्रभागा स्नान
Ubhe Ringan
वारकर्‍याचे उभे रिंगण
कार्तिकीला विठु माऊलीचे दर्शन घ्यायला पंढरपुरात वारकर्‍यांची रिघ लागलेली असते. महाराष्ट्राच्या कानांकोपर्‍यांतून असंख्य वारकरी विठुरायाचे दर्शन घ्यायला पंढरपुरात दाखल होतात. चंद्रभागेच्या काठी वाळवंटी  वारकर्‍यांचा जणू मेळाच लागलेला असतो. वारकर्‍यांचा आट्यापाट्या, लगोर्‍या ह्या खेळांचा डाव वाळवंटी रंगलेला असतो. आणि वारकर्‍याचे उभे रिंगण पाहताना त्यांचे, त्यांच्या विठु माऊली प्रती असणारे प्रेम अनुभवणे म्हणजे जणू अपूर्व पर्वणीच... विठ्ठलाचे नामस्मरण करताना, अभंग गाताना सर्व जण एकतारीवर एकरुप होऊन जातात. चंद्राभागेत स्नान करुन, प्रथम भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर विठु माऊलीचे दर्शन घ्यायला वारकर्‍यांची गर्दी होते.

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ।
आट्यापाट्या आणि लगोर्‍या गोट्या डाव मांडीला ।


Warkari
वारकरी - १
काही वर्षांपूर्वी सद्गुरु कृपेने  मला आषाढीला आळंदीवरुन पंढरपुरला निघाणार्‍या माऊलींच्या म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत आळंदी ते पुणे वारी करायची संधी मिळाली होती.
लहान मोठ्या अनेक मंडळांच्या पालख्या आणि दिंड्या ह्या वारीत सहभागी होतात. वारकर्‍यांची शिस्त, तन्मयता, त्यांचे विठु माऊली प्रती असणारे प्रेम जवळून अनुभवायची संधी मिळाली. माऊलीच्या भेटीची ओढ वारकर्‍यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसते, अगदी एकमेकांना देखील ते ‘माऊली’ ह्याच नावाने हाक मारतात. लहानग्यांपासून ते वृद्ध, प्रत्येक वयोगटातील वारकरी तेवढ्याच उत्साहात वारीत आनंदाने सहभागी होतात.
Warkari
वारकरी - २
काही जण डोक्यावर तुळस घेऊन... तर काही जण डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन, काही जण विठुरायाची मुर्ती डोक्यावर घेऊन... तर काही जण पताका नाचवित, काही जण टाळ चिपळ्यांच्या गजरात अभंग गात... तर काही जण एकतारीवर मुखाने विठुरायाचे नामस्मरण करीत वारी करतात.

अवघे गर्जे पंढरपुर । चालला नामाचा गजर ।


आपण देखील जिथे असू त्या ठिकाणाहून मनाने आणि प्रेमाने ह्या वारीत नक्कीच सामिल होऊ शकतो. तर काय मग ? होणार ना सामिल वारीत... यंदाच्या कार्तिकीला ?


पंढरपुराला जायाचे... जायाचे... जायचे...
अन्‌ तिथेच मजला राहायचे... राहायचे...
घर ते माझ्या रायाचे... रायाचे...
पंढरपुराला जायाचे...
 
Warkari
पंढरपुरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी

Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 9:19 PM | No comments

इको - फ्रेंडली गणेश मुर्ती

काल दुपारी सहज बसलो असताना काहीतरी ठोकण्याचा आवाज यायला लागला, म्हणून खिडकीतून बाहेर पाहिले तर बिल्डिंगमध्ये खाली Stage आणि मंडप बांधायचे काम सुरु होते आणि मग लक्षात आले की, गणपती बाप्पा जवळ आलेत आणि पुन्हा वेध लागले ते बाप्पाला घरी आणण्याचे. लोकमान्य टिळकांनी साधारणतः १८५२ च्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला आणि त्यामागची त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती, जनतेला एकत्र आणून समाज प्रबोधनाचा त्यांचा प्रयास होता. असो, नुकताच आपण भारताचा ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला, आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला खरा परंतु प्रदूषणापासून स्वतंत्र झाला आहे का?
मग ते प्रदूषण कोणतेही असो, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा मग जलप्रदूषण. आता जर तुम्ही रस्त्यावरून चालताना नजर टाकली तर आपल्याला सगळीकडे गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर रेखीव मूर्ती बघायला मिळतील. आणि मग त्या घेण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. पण सध्या मूर्ती घडविण्यासाठी जास्त प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिस (Plaster of Paris) चा वापर केला जातो आणि त्यांना आकर्षक बनविण्यासाठी रासायनिक रंगांचा... पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मुर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग हे पर्यावरणाला खूपच हानीकारक आहेत. एकतर प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही; आणि जेव्हा बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन आपण समुद्राच्या पाण्यात करतो तेव्हा हे रासायनिक रंग पाण्यात विरघळून त्याचा त्रास पाण्यातील जलचरांना होतो.

खरे पहाता ज्या गोष्टी पाण्यामध्ये विरघळत नाहीत, त्या गोष्टी पाण्याची oxygen level कमी करतात. म्हणजेच आपण किती जास्त प्रमाणात पर्यावरणाची हानी करतो आहोत. आणि पर्यावरणाचा असंतुलीतपणा म्हणजेच balance बिघडत चालला आहे.  गणपती बाप्पाच्या शाडूच्या मातीच्या रेखीव आणि सुबक मूर्ती घडवल्या जातात. ह्या मूर्ती वजनाने जड असतात आणि किंमतीने सुद्धा इतर मुर्तींपेक्षा महाग असतात. त्यामुळे सर्रास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती ह्या अधिक प्रमाणात विकल्या जातात. आपण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रावर जाऊन पाहिलंत तर ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे संपूर्णतः विघटन न झाल्यामुळे त्यांचे अवशेष किनाऱ्याकडे वाहून येतात. ज्या बाप्पाची आपण इतके दिवस प्रेमाने प्राण-प्रतिस्थापना करतो त्याचे हे विसर्जनानंतरचे चित्र डोळ्यात पाणी आणते.
मग हे सगळे टाळण्यासाठी शाडूच्या मातीचा पर्याय किती उत्तम आहे!!! आपण आपल्याला आवडणारी गोष्ट कितीही महाग असली तरी जास्त किंमत देऊन ती विकत घेतोच ना? मग आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपण एवढे सुद्धा का नाही करू शकत? जरा विचार करा, ‘गणपती बाप्पाच्या मूर्ती विसर्जन केल्यावर काही तासातच पाण्यात आपोआप विरघळल्या आणि मूर्ती बनविताना वापरलेल्या रंगांचा वातावरणावर कोणताही परिणाम झाला नाही तर? आणि समुद्रातील जलचरांना त्या मूर्ती बनविताना वापरलेल्या साहीत्यांचा अन्न म्हणून वापर झाला तर?’ छान वाटलं ना ऐकूनच? श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट अंतर्गत सन २००४ सालापासून कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर सुबक मूर्ती बनविल्या जातात. श्रद्धवान भक्तांनी ‘अनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बॅंक ऑफ रामनाम’ मध्ये लिहून जमा केलेल्या रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून ह्या मुर्ती बनविल्या जातात. पाण्यात अगदी सहजपणे विरघळल्या जाणार्‍या ह्या मूर्ती बनविण्यासाठी खाण्याचा डिंक, इको-फ्रेंडली व्हाईटनिंग कॅल्शियम पाऊडर वापरली जाते आणि मुर्तींना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. ह्या मूर्ती वजनाला खूप हलक्या व पूर्णपणे ईको-फ्रेंडली आहेत आणि तितक्याच रेखीव व सुंदर. आज आपण घरोघरी, गल्लोगल्ली गणपतीची स्थापना झालेली बघतो, मग जर आपण इको-फ्रेंडली गणेशमूर्ती वापरण्यास सुरुवात केली म्हणजेच प्रत्येकाने जर हा विचार केला तर आपण निदान काही प्रमाणात तरी प्रदूषणाला आळा घालू शकतो. आणि ह्या मूर्ती कृत्रिम तलाव किंवा घरी बादलीमध्ये सुद्धा सहजपणे विसर्जित होऊ शकतात आणि तेही काही क्षणांमध्ये.

अधिक माहीतीसाठी आपण खाली दिलेल्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती ह्या वेबसाईटला भेट देऊ शकतो.
http://aniruddhabapu-ecofriendlyganeshmoorti.blogspot.in/

तर मग बोला
गणपती बाप्पा मोरया...!!!
कालच ‘मेरी कोम’ ह्या चित्रपटातील ‘सुकून मिला’ हे गाणे ऐकले, आणि ह्या गाण्यातील ‘सासोंको तुने छुआ... सुकून मिला’ हे शब्द ऐकले तेव्हा ‘श्रीश्वासम्‌’ उत्सवातील सुखद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. श्रीश्वासम्‌ उत्सवात आपल्याला आपल्या परमपूज्य बापूंनी मोठ्या आई ‘चंडिके’ चे खुप प्रेम भरभरून दिले. आणि आपण जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकू तेव्हा तेव्हा बापू आणि मोठ्या आईचे हे प्रेम, ही ‘लाभेविण प्रिती’ सतत अनुभवत राहू...

ह्या व्हिडियोतील सगळे फोटो पूज्य समीरदादांच्या फेसबुक पेज वरील आहेत.

अंबज्ञ.






रागचे आजोबा झोपाळ्यावर बसून आकाशवाणीवर जुनी हिंदी गाणी ऐकत होते, आणि पराग कॉम्प्युटरवर गेम खेळण्यात मग्न होता. तेवढ्यात किशोरकुमारचे ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन...’ हे गाणे लागले, आणि ते मनातून थोडे खट्टू झाले. न राहवून त्यांना सतत वाटत होते ही आजकालची पिढी फक्त मोबाईल गेम्स्‌, कॉम्प्युटरवर गेम्स्‌ ह्यांनाच जास्त महत्व देते. मैदानी खेळ हे आजच्या धकाधकीच्या जीवनातूनमुळी हद्द्पारच झाले आहेत. आणि त्यामुळेच मुलांमध्ये डिप्रेशन, न्यूनगंड आणि एकटेपणा येतो, आणि ह्या एकटेपणामुळे संघिक काम करणे जमत नाही. मैदानी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न होते, शरीर सुढ्रुढ होते, आत्मविश्वास आणि जो आनंद मिळतो त्याने मनाला नवीन काम करण्याची शक्ती आपोआप मिळते.
   
लगोरी
लगोरी
अनेक पालक आपल्या मुलांना ज्या खेळातून अधिक पैसा आणि प्रसिद्धी मिळते असे खेळ खेळण्यास प्रोत्साहीत करतात, आणि ह्यामुळे प्राचीन खेळांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आपले प्राचीन भारतीय खेळ (उदा. लंगडी, खो-खो, आट्यापाट्या, बटाटा शर्यत, सुरपारंब्या, लगोरी, विटीदांडू) असे आहेत की ते खेळल्याने आनंद तर मिळतोच परंतु सांघिक भावना, चटकन निर्णय घेण्याची ‘निर्णय क्षमता’, चपळता, निरीक्षणशक्ती देखील वाढते. असे एक ना अनेक फायदे ह्या खेळांचे आहेत. दररोज खेळणे खुपच छान पण आठवड्यातून एकदा खेळल्यामुळे देखील संपुर्ण आठवडा काम करण्यासाठी लागणारी ‘ऊर्जा’ आपल्याला मिळतेच. कठीण काळातून बाहेर येण्यासाठी, निखळ आनंद आणि मजेसाठी खेळासारखे दुसरे औषध नावाला शोधून देखील सापडणार नाही. प्रत्येकाला एखादा खेळ कसा खेळावा हे बघून देखील सहजपणे समजू शकते आणि त्यामुळेच खेळाला भाषेचे, सीमेचे, वयाचे कुठलेही बंधन उरत नाही.
बटाटा शर्यत
बटाटा शर्यत

    परमपूज्य बापूंनी म्हणजेच ‘डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी’ ह्यांनी रामराज्याच्या प्रवचनात ‘अनिरुद्धाज्‌ इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‍स्‌ ऍन्ड बोन्साय्‌ स्पोर्ट्‍स्‌’ ची स्थापना केली आहे. परमपूज्य बापू स्वतः ह्याचे मुख्य (डीन) आहेत. आपल्या पैकी अनेकांना हे माहीत असेल नसेल, बापू स्वतः उत्तम पोहतात, उत्तम क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी खेळतात, मल्लखांब आणि भारतीय प्राच्चविद्येवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहेच. अश्या आपल्या लाडक्या बापूंनी आपल्या सर्वांसाठी हे ‘बिते हुए दिन’ परत आणले आहेत. ह्या इन्स्टिट्यूट अंतर्गत सध्या पाच पुरुषार्थ मंडलम्‌ कलश अंतर्गत ठराविक उपासना केद्रांवर हे खेळ खेळले जातात, आणि ‘श्रीहरिगुरुग्राम’ येथे सध्या प्रशिक्षक शिबीर चालू आहे. परमपूज्य बापूंच्या आशिर्वादाने सर्व उपासना केद्रांवर हळुहळु हे खेळ सुरु होतील. आपण देखील सध्या ह्या पाच पुरुषार्थ मंडलम्‌ कलश अंतर्गत येणार्‍या उपासना केद्रांवर जाऊन खेळू शकतो तसेच जर आपल्याला प्रशिक्षक म्हणून सेवा करण्याची इच्छा असेल तरी देखील आपण ‘विनामुल्य’ ह्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकतो. कोणतीही फी अथवा देणगी मुल्य इथे आकारले जात नाही. मला स्वतःला खेळल्याने खुप आनंद व आठवडाभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा तर मिळते. त्यामुळे निखळ आनंद देणार्‍या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आपणही आनंदाने सहभागी होऊ शकतो. काय मग येणार ना ह्या इन्स्टिट्यूटमध्ये ?