Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:50 PM | 4 comments

एकादशी आणि पंढरीची वारी

आषाढी-कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग


Pandurang, Vitthal
पांडुरंग
कादशी जस-जशी जवळ येते तस-तशी संत चोखामेळा ह्यांच्या अभंगातील ह्या ओव्या नकळतच मुखी येतात. एका वर्षात जवळपास २४ एकादशी येतात, पण अधिक मास असणार्‍या वर्षात २६ एकादशी येतात. वैदिक हिंदु धर्मात एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे; आणि ‘आषाढी’ आणि ‘कार्तिकी’ एकादशी म्हणजे वारकर्‍यांसाठी जणू आनंदाची पर्वणीच... भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठाविस युगं भगवान महाविष्णुचा नववा अवतार असणारा ‘पांडुरंग’ कटीवर हात  ठेऊन पंढरपुरी, चंद्रभागेतीरी उभा आहे. वारकरी आषाढी , कार्तिकी पंढरपुरी वारी करतात.


‘देवशयनी आषाढी एकादशी’ ते ‘प्रबोधिनी कार्तिकी एकादशी’ ह्या दरम्यानच्या पवित्र काळाला ‘चार्तुमास’ असे मानले जाते. प्राचिन हिंदु ग्रंथांतील संदर्भाप्रमाणे ‘भगवान महाविष्णु’ योगनिद्रेत जातात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी आणि भगवान महाविष्णु योगनिद्रेतून पुन्हा जागे होतात म्हणजेच त्यांना प्रबोध केले जाते तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. म्हणुनच ह्या ‘कार्तिकीला’ अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या चार्तुमासात धार्मिक वृत्तीची अनेक माणसे व्रत करतात.


अशी आख्यायिका आहे की, विजयनगरचा राजा ‘कृष्णदेवराय’ ह्यांनी पंढरपुरातुन विजयनगरला नेलेली विठुरायाची मुर्ती ‘संत भानुदास महाराज’ (संत एकनाथ महाराजांचे पणजोबा) ह्यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पुन्हा पंढरपुरात आणली. आणि पुन्हा एकदा कार्तिकीच्या उत्सवाला पंढरपुरात सुरुवात झाली.


Chandrabhaga Snan, Chandrabhaga
पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला झालेली वारकर्‍यांची गर्दी आणि चंद्रभागा स्नान
Ubhe Ringan
वारकर्‍याचे उभे रिंगण
कार्तिकीला विठु माऊलीचे दर्शन घ्यायला पंढरपुरात वारकर्‍यांची रिघ लागलेली असते. महाराष्ट्राच्या कानांकोपर्‍यांतून असंख्य वारकरी विठुरायाचे दर्शन घ्यायला पंढरपुरात दाखल होतात. चंद्रभागेच्या काठी वाळवंटी  वारकर्‍यांचा जणू मेळाच लागलेला असतो. वारकर्‍यांचा आट्यापाट्या, लगोर्‍या ह्या खेळांचा डाव वाळवंटी रंगलेला असतो. आणि वारकर्‍याचे उभे रिंगण पाहताना त्यांचे, त्यांच्या विठु माऊली प्रती असणारे प्रेम अनुभवणे म्हणजे जणू अपूर्व पर्वणीच... विठ्ठलाचे नामस्मरण करताना, अभंग गाताना सर्व जण एकतारीवर एकरुप होऊन जातात. चंद्राभागेत स्नान करुन, प्रथम भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर विठु माऊलीचे दर्शन घ्यायला वारकर्‍यांची गर्दी होते.

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ।
आट्यापाट्या आणि लगोर्‍या गोट्या डाव मांडीला ।


Warkari
वारकरी - १
काही वर्षांपूर्वी सद्गुरु कृपेने  मला आषाढीला आळंदीवरुन पंढरपुरला निघाणार्‍या माऊलींच्या म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत आळंदी ते पुणे वारी करायची संधी मिळाली होती.
लहान मोठ्या अनेक मंडळांच्या पालख्या आणि दिंड्या ह्या वारीत सहभागी होतात. वारकर्‍यांची शिस्त, तन्मयता, त्यांचे विठु माऊली प्रती असणारे प्रेम जवळून अनुभवायची संधी मिळाली. माऊलीच्या भेटीची ओढ वारकर्‍यांच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसते, अगदी एकमेकांना देखील ते ‘माऊली’ ह्याच नावाने हाक मारतात. लहानग्यांपासून ते वृद्ध, प्रत्येक वयोगटातील वारकरी तेवढ्याच उत्साहात वारीत आनंदाने सहभागी होतात.
Warkari
वारकरी - २
काही जण डोक्यावर तुळस घेऊन... तर काही जण डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन, काही जण विठुरायाची मुर्ती डोक्यावर घेऊन... तर काही जण पताका नाचवित, काही जण टाळ चिपळ्यांच्या गजरात अभंग गात... तर काही जण एकतारीवर मुखाने विठुरायाचे नामस्मरण करीत वारी करतात.

अवघे गर्जे पंढरपुर । चालला नामाचा गजर ।


आपण देखील जिथे असू त्या ठिकाणाहून मनाने आणि प्रेमाने ह्या वारीत नक्कीच सामिल होऊ शकतो. तर काय मग ? होणार ना सामिल वारीत... यंदाच्या कार्तिकीला ?


पंढरपुराला जायाचे... जायाचे... जायचे...
अन्‌ तिथेच मजला राहायचे... राहायचे...
घर ते माझ्या रायाचे... रायाचे...
पंढरपुराला जायाचे...
 
Warkari
पंढरपुरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी

4 comments:

  1. हरि ॐ. विनायकसिंह आषाढी आणि कार्तिकी एकादशी म्हणजे पंढरीची वारी ! वारकर्‍यांसाठी त्यांच्या विठू माऊली संगे आनंदाने नाचा-बागडण्याची सुवर्ण पर्वणी -जणू काही खरा दिवाळी -दसराच असतो त्यांच्या साठी हा !
    कार्तिकीचे अनन्यसाधारण महत्त्व वाचून ह्या वारीमागची वारकर्‍यांची प्रेमळ भावना मनाला भिडली...
    आपण पंढरीच्या वारीत स्वानुभव घेऊन ह्या आगळ्या-वेगळ्या आनंदाची चव चाखलीत हे वाचून खूप आनंद झाला की आजही युवा-पिढीला ह्या पंढरीच्या विठूमाऊलीचे प्रेम दाटून येते.
    प्रत्यक्षात पंढरीच्या वारीचे पुण्य गाठीशी नसले तरी आपला लेख वाचून वारी केल्याचाच अवर्णनीय आनंद लुटता आला ह्या बद्दल मनस्वी आभार.
    अप्रतिम लेखनशैली !!!

    ReplyDelete