Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 12:58 PM | 2 comments

नातं

नातं जपावं... नातं फुलवावं...
प्रेमानं आपल्या... आपलं नातं बहरावं...

खुप वेळा आपण ऐकतो "नातं हे टिकवता आलं पाहिजे" पण मला असं वाटतं की, ‘नातं’ टिकवण्यापेक्षा नातं जपलं गेलं पाहिजे. आपण वस्तू टिकवतो, पण त्या देखील आयुष्यभर राहतीलच असे नाही. कालांतराने त्यापण विरुन जातात, त्यांना जाळी लागते, त्या जीर्ण होतात आणि मग त्या संपुष्टातही येतात. पण जपलेल्या गोष्टी म्हणजेच ‘सुखद आठवणी’ ह्या आयुष्यभर साथ देतात. सुख-दु:खांमध्ये आधार देतात. म्हणूनच ‘नाती’ ही जपली गेली पाहिजे.



अनेकदा आपण पाहतो की, छोट्या छोट्या गोष्टींवरुन नात्या-नात्यांमध्ये गैरसमज, गैरसमजांतून वाद आणि त्या वादांचे रुपांतर मग भांडणात होते आणि त्या नात्याला पूर्णविराम मिळतो. वाद होणे काही चुकीचे नाही, आपण सामान्य माणसं आहोत. कोणीही व्यक्ती पूर्णपणे बरोबर किंवा चुकीची नसते. पण घरा-घरांत होणार्‍या लहान-सहान वादांमुळे कायमचे तुटणारे बंध मात्र मनाला कायमची टोचणी लावून जातात. "घरोघरी मातीच्या चुली" असे म्हणतात हे चुकीचे नाही. नात्याला पुर्णविराम देण्यापेक्षा तिथे एक स्वल्पविराम द्यावा आणि तेच नाते पुढे चिरकाल टिकवावे. ज्याप्रमाणे रबर दोन्ही बाजूंनी ताणला तर तुटतो, अगदी त्याचप्रमाणे नात्यांचे देखील आहे. एकाने तरी नमती बाजू घेतली की नातं जपण्यास आपसूकच मदत होते. आपल्याला अनेकदा खुप राग येतो आणि मनात नसताना देखील रागाच्या भरात आपण काहीतरी चुकीचे बोलून जातो, पण काही वेळाने आपल्याला आपण ती केलेली गोष्ट चुकीची वाटते आणि मग पश्चाताप होऊन, आपण उगीच एवढे चिडलो असे देखील वाटते.





कुटुंबामध्ये एकत्र राहत असो वा नसो कुठेतरी काहीतरी बिनसतेच. पण ही ‘सलं’ मनात न ठेवता पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नात्यातील सेतू बांधावा आणि संसाररुपी सागरातून आपली नौका तारुन न्यावी. कोणीही Perfect नसतेच, लहान मोठ्या चुका ह्या प्रत्येकाकडून होतच असतात. मग ह्याच चुका मनात ठेवून नाते तोडणे किती योग्य आहे?


देव सुद्धा आपल्या चुका पदरात घालतोच नां? मग आपण सामान्य माणसे का बरे एवढी अडून बसतो? जर समोरची व्यक्ती चुकली असेल आणि त्या व्यक्तीला आपल्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर आपणसुद्धा एक पाऊल मागे घेण्यात काय हरकत आहे? क्षमा मागण्याने किंवा क्षमा करण्याने कोणीही लहान-मोठा होत नसतो. देवाने आपल्याला दिलेल्या सुंदर आयुष्यामध्ये वाद-विवादांचे बांडगूळ ठेवण्यापेक्षा प्रेमाचा वटवृक्ष लावून तो सतत बहरत ठेवला पाहीजे, मग त्याच्या सावलीत जगण्याची खरी मजा आहे.


 

प्रेम द्या आणि प्रेम घ्या... अहंकार, राग, रुसवे-फ़ुगवे, वाद मैलोनमैल लांब ठेवले पाहीजे. जीभेवर जर गोडवा असेल तर सारे जीवनच मधुर होईल नां. धारदार शब्दांपेक्षा आधार देणारे शब्द वापरावे आणि नाती प्रेमाने फुलवावे. आपले आयुष्य खुपच लहान आहे, आपण ते प्रेम वाटण्यात घालवले पाहीजे. नाते जपण्यासाठी एकमेकांचे गुण-दोष स्विकारुन नाते जपले पाहीजे. एकमेकांबद्द्ल वाटणारी आत्मियता कधीच कमी होऊ देता कामा नये. कारण नाते हे काचे सारखे आहे ते तुटण्यापासून जपावे.



नाते जुळले मानाशी मनाचे...

आता हे झाले मानवी पातळीवर. आध्यात्मिक पातळीवर देखील नातं जपणं हे खुप महत्वाचे आहे. अकारण कारुण्याचा सागर असलेला तो भगवंत कोणाशीही असलेले त्याचे नाते कधीच तोडत नाही, कारण तो कधीच कोणाला विसरत नाही आणि त्याने दिलेला शब्द हा ‘तो’ पाळतोच. ‘तो’ क्षमावंत भगवंत आपल्याला वारंवार ‘संधी’ देतच राहतो, पण आपणच ‘त्याच्या’ पासून लांब पळत राहतो.


जनम जनम का नाता है तेरा मेरा... याद रहा प्रभू तूम को मैं भूला बिसरा


त्या दिवशी वाचनात खुप छान वाक्य आले,


माझ्या देवाचे आणि माझे नाते हे वेगळेच आहे. दिवसाच्या शेवटी ‘तो’ ही विसरतो आणि मी ही, मी केलेल्या चुका

परमपूज्य बापूंनी आपल्याला मागचे वर्ष हे प्रेम वाटायचे वर्ष आहे असे सांगितले होते, आणि हे वर्ष हे नियमित भक्ती करण्याचे व वाढविण्याचे वर्ष आहे असे सांगितले आहे. नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले आहे, आणि प्रत्येक जण नवीन वर्षात नवनवीन संकल्प करतोच. चला मग आपण देखील संकल्प करुया की, प्रेम वाटून मानवी पातळीवर आपण एकमेकांशी नातं जपू तसेच नियमित न चुकता जास्तीत उपासना करुन भगवंताशी असणारे आपले नाते जपूया आणि ते अधिकाधिक घट्ट करुया.
Categories:

2 comments: