काल म्हणजेच दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ रोजी आसाम गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम येथे 'दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचा' दिमाखदार उत्घाटन सोहळा पार पडला. जवळपास पाऊणे दोन तास चाललेल्या ह्या उत्घाटन सोहळ्यात भारताच्या पूर्व भागातील सांस्कृतिक समृद्धी आणि विविधतेची झलक सादर करण्यात आली. ह्या स्पर्धा जवळपास १२ दिवस गुवाहाटी आणि शिलाँग येथे एकाचवेळी चालणार आहेत.

आता आपण थोडसं ह्या स्पर्धेविषयी जाणून घेऊया. साधारणपणे सन १९८४ रोजी ह्या स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा द्विवार्षिक म्हणजेच दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी स्पर्धा ‘सैग’ ह्या नावाने देखील ओळखली जाते. सन १९८३ साली स्थापन झालेली दक्षिण आशियाई खेळ परिषद ह्या स्पर्धेचे आयोजन करते. आशियातील अफगाणिस्तान, नेपाल, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत, भूटान, मालदीव आणि श्रीलंका हे आठ देश ह्या परिषदेचे सदस्य आहेत. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणारा लहान गेंडा ''शांति, प्रगति आणि समृद्धिसाठी खेळा...'' हा संदेश देतो आहे.



यंदा ह्या स्पर्धेचे १२ वर्ष आहे, आणि भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या देशांचे मिळून एकंदर २६०० खेळाडू सहभागी झाले आहेत. बॅटमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती सारख्या एकंदर २३ खेळांतील २२८ विविध प्रकारात स्पर्धा होणार असून; २२८ सुवर्ण, २२८ रौप्य आणि ३०८ कांस्य पदकांसाठी खेळाडूंमध्ये चुरस असणार आहे. भारताचे सर्वात जास्त म्हणजेच ५२१ जणांचे पथक सहभागी झाले आहे, आणि त्यात २४५ खेळाडूंचा समावेश आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे सलग ११ वर्ष भारत ह्या स्पर्धेच्या पदक तालीकेत अव्वल क्रमांकावर राहीला आहे. काल दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पार पडलेल्या संचलन सोहळ्यात प्रत्येक देश आपापल्या देशातील नदीचे पाणी सोबत घेऊन आले होते, आणि दक्षिण आशियाई देशांची एकजूट म्हणून हे पाणी 'ब्रम्हपुत्रा' नदीत विसर्जित करण्यात येणार होते.

खरचं, खेळ हा मनावर आलेल्या मरगळीचे रुपांतर 'उत्साहात' करतो. लहान असो वा मोठा प्रत्येकाला खेळायला आवडतेच. कारण खेळाला भाषा किंवा इतर कोणत्याही सीमेचे बंधन नाही. मनावर असलेला त्राण खेळल्याने काही वेळ का होई ना निघून जातो, मन मोकळं करुन जातो. खेळात हार-जीत तर होतचं असते, खिलाडूवृत्तीने आपल्याला आपली हार-जीत स्विकारता आली पाहीजे. खेळ आपल्याला संघभावना, समन्वय, चिकाटी, श्रम, सातत्य अश्या अनेक गोष्टी शिकवून जातो. खेळ हे आजच्या धकाधकीच्या जमान्यात 'औषध' बनत चालले आहे.

ह्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू आपले नाणे खणखणित वाजवून, ब्राझिल मध्ये होणार्‍या रिओ ऑलिंपिक मध्ये भारताचे नेतृत्व करुन पदक मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतीलच. चला तर, मग आपणही भारताला स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देऊन ह्या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटुया.
Categories:

0 comments:

Post a Comment