हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
हेंचि माझी सर्व जोडी
माझी सर्व जोडी, हेंचि माझी सर्व जोडी

रती लिहिलेली संत तुकाराम महाराजांची रचना आपल्यापैकी अनेकांनी गणपती बाप्पाची आरती करून झाल्यावर घेण्यात येणाऱ्या भजनात म्हटली असेलच... ही स्वर्गीय रचना, त्याची चाल ऐकताना आपले मन नकळत 'त्या' परमेश्वराशी जोडले जाते. ह्या अप्रतिम रचनेला आपल्या सुमधुर आणि अजरामर संगीताने स्वरबद्ध केलं ते श्रीनिवास विनायक खळे (खळे काका) यांनी. भावगीतं असो की भक्तीगीतं, चित्रपटगीतं असो की स्फूर्तिगीतं, प्रेमगीतं असो की बालगीतं, नाट्यगीत असो की लावणी अश्या एक-ना-अनेक प्रकारच्या गीतांना खळे काकांनी आपल्या सुरेल, सुमधुर संगीताने स्वरबद्ध केले आहे. आणि म्हणूनच एक रिपक्व आणि सर्वांगपरिपूर्ण संगीतकार ही बिरुदं खळे काकांना अगदी चपखल बसतील.

श्रीनिवास विनायक खळे (खळे काका)

खळे काकांचा जन्म ३० एप्रिल १९२६ साली मुंबईचा. वडील बडोदा, गुजरात येथे नोकरीला असल्याने खळे काकांचे बालपण तिथेच गेलं. बडोद्यातील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयातून गाण्याचे प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि पंडित मधुसूदन जोशी, उस्ताद फैय्याज खाँ, निसार हुसैन खाँ, गुलाम रसूल अश्या दिग्गजांच्या तालिमीत खळे काकांनी संगीताचे धडे गिरविले. खळे काकांचा शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम होता. "मला शास्त्रीय गायक व्हायचं होतं, जन्मात कधी सुगम संगीताकडे जाईन असं वाटलं नव्हतं" असं खुद्द खळे काकांनीच म्हटलं आहे.

पण आयुष्यात एक घटना घडली आणि एक संगीतकार म्हणून खळे काकांचा प्रवास सुरु झाला. ते घडले असे की, एकदा खळे काकांच्या भावाचे मित्र एक ग. दि. माडगूळकरांचे गाणं घेऊन घरी आले आणि म्हणाले, "ह्या गाण्याला तू चाल कर." त्यावर खळे काका म्हणाले, "अहो चाल करणं वेगळं आहे आणि गाणं वेगळं आहे; मला नाही करता येणार." त्यावर ते मित्र म्हणाले की, "काय तू इतकं क्लासिकल गातोस; तुला चाल नाही करता येत?" खळे काका त्या मित्राला म्हणतात "ते वेगळं आहे नाना, मला नाही जमणार ते." तेव्हा ते मित्र काकांना म्हणतात की, "तू प्रयत्न तर कर?" आणि काकांनी त्यांच्या आयुष्यातलं ते पहिलं गाणं संगीतबद्ध केलं.

खळे काकांचे वडील हे बालगंधर्वांचे चाहते. खळे काकांचे बालपणीचे गायन ऐकून बालगंधर्व त्यांच्या वडीलांना म्हणाले, "हा मुलगा मला द्या, हा मोठा गायक होईल." तेव्हा काकांचे वडील म्हणाले की, "मला मुलाला नाटक्या नाही करायचं." 'पेशा' नाही तर 'छंद' म्हणून गाणं-वाजवणं हे खळे काकांच्या वडिलांना मान्य होतं. पण काकांना तर आयुष्यात संगीताशिवाय दुसरं काहीच करायचं नव्हतं. संगीताच्या ध्यासापायी  अनेक उत्तमोत्तम नोकऱ्यांचा त्याग खळे काकांनी केला. आणि नशीब आजमावयाला म्हणून एकदा घरातून पळून ते मुंबईला आले. जिद्द, कष्टाची तयारी, स्वतःच्या गुणवत्तेवरचा दुर्दम्य विश्वास, प्रतिभेचे पंख आणि परमेश्वरावरची अढळ श्रद्धा ह्यांच्या जोरावर खळे काकांनी संगीतप्रेमी रसिकांची मनं जिंकून घेतली ती कायमची.

ह्याच महिन्यांत म्हणजेच २ सप्टेंबर २०१६ रोजी खळे काकांची पाचवी पुण्यतिथी झाली. त्यांच्या संगीताची मोहिनी आजही समस्त संगीतप्रेमींच्या मनावर गारुड करुन आहे व या पुढेही ती अशीच निरंतर राहील ह्यांत तिळमात्र शंका नाही. खळे काकांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ह्या लेखमालिकेतून आपाल्याला माहिती देण्याचा प्रयास, प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा नक्कीच आवडेल. 


संदर्भ:- नक्षत्रांचे देणे कार्यक्रम.


2 comments:

  1. Ambadnya Rasikaveera. Really, Khale kaka's music is such a melodious and awesome that a true music lover can't forget heavenly compositions of Khale Kaka.

    ReplyDelete