Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 11:41 AM | 1 comment

द हंगर गेम्स - (भूक)

हानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड आहे. बरीचशी पुस्तकं, कदंबऱ्या वाचनात आल्या आहेत. त्यातली काही मनात घर करुन गेली आहेत. आठवडयापूर्वीच वाचलेली 'द हंगर गेम्स' ही सुझान कॉलिंस ह्यांनी लिहिलेली आणि सुमिता बोरसे ह्यांनी अनुवादित केलेली त्यामधलीच एक अविस्मरणीय कदंबरी... नावाप्रमाणेच ही वाचकाची वाचनाची भूक वाढवत नेऊन त्याला अक्षरशः झपाटून टाकते. एकदा वाचायला घेतलेली कादंबरी खाली ठेवावी असे वाटतच नाही.


ही काल्पनिक गोष्ट आहे 'पनामा' देशातील १२ नंबरच्या डिस्ट्रिक्ट्मध्ये राहणाऱ्या १६ वर्षाच्या 'कॅटनीस एव्हरडीन' आणि 'पीटा मेलार्क' ह्यांची. ह्या देशात साधारणपणे १२ लहानमोठी डिस्ट्रिक्ट्स आहेत. त्यापैकी काही डिस्ट्रिक्ट्स ही एवढी गरीब आहेत, की त्या डिस्ट्रिक्ट्स मधील लोकांना साधं दोन वेळीचं अन्नसुद्धा मिळत नाही आणि कधीकधी तर ते खूप प्रयास करुन मिळवावे लागते. १२ नंबरच्या डिस्ट्रिक्ट्ची व्यथा याहून वेगळी नाही. इथे होणाऱ्या मृत्यूला उपासमारी हेच मुख्य कारण आहे. इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय 'खाणकाम' हा आहे. १८ व १८ वर्षाखालील प्रत्येकाला दरवर्षी त्यांचे शिधापत्रिकेत नाव नोंदवावे लागते. असे केल्यास त्यांना सरकारकडून दर महिना मोफत शिधा वाटली जाते. पण ही शिधा जेमतेम २/३ दिवस पुरेल एवढीच असते. मग महिन्याचे उरलेले दिवस त्यांना १ वेळ खाऊन वा कधीकधी उपाशी राहून ढकलावे लागतात.

देशात दरवर्षी 'हंगर गेम्स' नावाची एक अत्यंत क्रूर स्पर्धा TV वर प्रसारित होत असते. शिधापत्रिकेत नावाची नोंद असलेल्या १८ वर्षाखालील मुलामुलींना ह्यांत भाग घेणे बंधनकारक आहे. सर्व डिस्ट्रिक्ट्स मधून प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन स्पर्धक चिठ्ठया काढून निवडले जातात. २४ स्पर्धकांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेचा असा नियम आहे की, स्पर्धकाने इतर प्रतिस्पर्धी स्पर्धकांना मारुन टाकायचे आणि त्याने स्वतः कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत जिवंत राहायचे. (Survive in any situation and condition) जो/जी स्पर्धक शेवटपर्यंत जिवंत राहील तो/ती त्या वर्षीच्या 'हंगर गेम्स' स्पर्धेचा विजेता/विजेती ठरेल. विजेत्या स्पर्धकाचा यथायोग्य सत्कार आयोजक करतात आणि त्याची व त्याच्या संपूर्ण परिवाराच्या अन्न, वस्त्र आणि निवारा हया मूलभूत गरजाची जबाबदारी आयोजक (सरकार) स्वतः घेतात. प्रेक्षक ह्या स्पर्धेत कोणता स्पर्धक जिंकेल यावर भरपूर सट्टा खेळतात, तर आयोजक स्पर्धकांना बाहुल्यासारखे आपल्या तालावर नाचवून एकमेकांविरुद्ध लढायाला भाग पाडतात. स्पर्धेच्या आधी सर्व स्पर्धकांना स्पर्धा जिंकण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. 

आपल्या लहान मुलामुलींना ह्यांत जीव गमावताना बघणे खूप त्रासदायक असल्यामुळे काही डिस्ट्रिक्ट्स मध्ये स्पर्धेविषयी खूप चीड आहे. तर काही डिस्ट्रिक्ट्मध्ये ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी व त्यात जिंकण्यासाठी खेळाडूंची तयारी करुन घेतली जाते. ७४ व्या 'हंगर गेम्स' स्पर्धेसाठी १२ नंबरच्या डिस्ट्रिक्ट्मधून कॅटनीसची लहान बहीण 'प्रिमरोज' ची निवड झाली आहे. कॅटनीसचे 'प्रिम'वर खुप प्रेम असल्याने व प्रिम खूप लहान असल्यामुळे कॅटनीस स्वतः ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी जाते. कॅटनीस सोबत पीटा मेलार्क या मुलाची सुद्धा निवड होते. या पीटाचे कॅटनीसवर एकतर्फी प्रेम आहे.

स्पर्धा ऐन रंगात आली असताना आयोजकांकडून स्पर्धेच्या मूळ नियमांमध्ये बदल केला जातो. आता एक विजेता / विजेती ठरण्याऐवजी "एकाच डिस्ट्रिक्ट मधली जोडी विजयी ठरु शकते" असे ठरते. आपल्या बुद्धिचातुर्याने आणि अंगी असलेल्या विशेष कौशल्याने कॅटनीस खेळात जखमी झालेल्या पीटाला जंगलातून शोधते, व ते दोघेही ह्या स्पर्धेत विजयी होतात. कॅटनीस व पीटाकडे विशेष कौशल्य आहे जे त्यांना स्पर्धा जिंकायला मदत करते. ही स्पर्धा एका जंगलात खेळावली गेली असल्याने 'जंगलातील स्पर्धकांचे वास्तव्य', 'लढाई', 'डावपेच' आणि 'एका ११ ते १२ वर्षाच्या स्पर्धकाच्या मृत्युनंतर कॅटनीसच्या मनात स्पर्धेविषयी असलेली नाराजी' असे अनेक प्रसंग लेखकाने अक्षरशः डोळ्यासमोर उभे केले आहेत. कथेला वेग आणि दिशा असल्याने ती आपल्या समोर घडते आहे असे वाचकाला वाटल्याशिवाय राहत नाही. एक दर्जेदार कथा वाचायला दिल्याबद्दल लेखकांचे मनःपूर्वक आभार. ही कादंबरी वाचताना "रिकामी पोट माणूसाला काय काय करायला भाग पडू शकते ?" ह्याची प्रकर्षाने जाणीव होते.

ही कादंबरी वाचल्यावर काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग मला आठवाला. मी लोकलने घरी येत होतो. मी उतरायच्या दोन स्टेशन अगोदर एक माणूस माझ्या डब्यात शिरला. एकंदर त्याचा अवतारावरुन तो खूप गरीब वाटत होता. माझ्या समोरच्याच सीटवर तो बसला. खूप भूक लागली असल्याने तो थकलेला वाटत होता. त्याची नजर 'डब्यात काही खायला मिळते का ?' ह्याचा शोध घेत होती. अचानक त्याला कोणा व्यक्तिने सीटखाली फेकून दिलेली एक पिशावी दिसली, त्याने पटकन ती पिशावी उचलली व त्यातले खाऊ लागला. मला ते बघून खूप वाईट वाटले, कारण त्या पिशवीत सडलेली ७/८ द्राक्ष होती. त्या द्राक्षांचा चांगला भाग तो खात होता. मी कधीच स्वतःजवळ काही खायला ठेवत नाही मात्र नेमका त्यादिवशी माझ्या बॅगमध्ये मला आत्याने दिलेला बिस्किटचा पुडा होता. मला अजिबात राहावले नाही, मी लगेच तो बिस्किटचा पुडा त्याला दिला व त्याने तो घेतला देखील. मला खूपच बरे वाटले. मी देखील माझे उतरण्याचे स्टेशन आल्यावर उतरलो. खरच भूक माणसाच्या मनावर खूप वेगळा परिणाम करते. भुकेल्यांना 'अन्नदान' करुन आपण त्यांना नक्कीच मदत करु शकतो. तसेच लग्न वा इतर सण-समारंभात आवश्यक आहे तेवढेच अन्न घेऊन अन्नाचा अपव्यय टाळू शकतो.

शेवटी आपले 'आयुष्य' ही देखील एक स्पर्धाच आहे. जीवनात येणाऱ्या लहानमोठया घरघुती, वैयक्तिक, सामाजिक, वैवाहिक, आरोग्यीक आणि इतर लहान-मोठ्या अडचणी आणि आव्हानं म्हणजे 'खेळ'. परंतु बऱ्याचदा खेळ एकटयाने जिंकणे कठीण होऊन बसते. वर सांगितलेल्या आयुष्याच्या खेळात आपल्याला जर त्या खेळातला 'उत्तम सोबती' (सहस्पर्धक) आणि 'योग्य प्रशिक्षक' (सदगुरु / परमेश्वरी अधिष्ठान) मिळाले तर त्या खेळात आपली कामगिरी उत्तम आणि उल्लेखनीय होतेच आणि ही कामगिरी व  आत्मविश्वास आपल्याला ती स्पर्धा जिंकण्यासाठी खूप महत्वाची ठरते. आपण फक्त आपला नियमित 'सराव' (उपासना) नियमित सुरु ठेवला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या  भक्तीची भूक वाढविण्यास मदत होईल.

बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या भक्तीचीच 'भूक'
 


संदर्भ:
१.  'द हंगर गेम्स' कादंबरी (सुझान कॉलिंस लिखित आणि सुमिता बोरसे अनुवादित)

Categories:

1 comment:

  1. Nice article. Thanks for introducing us to gr8 book trilogy 'the hunger games'...

    ReplyDelete