संभाजी राजे... हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. धर्मवीर, रणधुरंधर, सिंहाचा छावा, कर्तव्यदक्ष अश्या उपमांची रत्न साहित्याच्या खजिन्यातून रिती केली तरी शंभू राजांच्या किर्तीच्या तराजूत त्यांचे वजन तूसभरही भरणार नाही. त्यांची किर्ती त्याही पेक्षा वर आहे.
छत्रपती संभाजी राजे |
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...’ त्याप्रमाणेच शंभू राजे लहानपनापासून अतिशय हुशार, तल्लख बुद्धी आणि आरसपाणी सौंदर्यांचे दैवी वरदान लाभलेले. अंगमेहनतीच्या जोरावर शंभू राजांनी उत्तम शरीरयष्टी देखील कमावली होती. पुरंदराच्या तहानुसार जेव्हा शिवाजी महाराजांना आग्र्याला जाणे भाग होते, तेव्हा वयाच्या अवघ्या नऊ-दहा वर्षांच्या शंभूराजांनाही आग्र्याला जावे लागले. महाराजांच्या अनुपस्थितीत बाळ शंभू राजे औरंगजेबाच्या दरबारात उपस्थिती लावत होते. नेतृत्व, राजकारणांतील बारकावे, रणांगणातील डावपेच, कमालीची हुशारी आणि मुत्सद्दीपणा शंभूराजांकडे असल्यामुळे दरबारात त्यांच्याशी चर्चा करताना भल्याभल्यांच्या नाकी नऊ येत असे.
शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर अवघ्या तेविस-चोविस वर्षांच्या शंभू राजांनी स्वराज्याची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. कौटुंबिक कलह, अष्ट्प्रधान मंडळीतील अनेकांची स्वराज्यद्रोहाची बंडाळी आणि परकीय शत्रूंच्या वाढत्या हालचालींना शंभू राजांनी आपल्या बाहूंच्या जोरावर रोखून धरले. आपल्या अल्पशा मावळ्यांना त्यांनी वानर सेनासागराप्रमणे तयार केले होते. गोव्याचे पोर्तुगीज, म्हैसूरचा चिक्कदेवराय राजा आणि जंजीर्याच्या सिद्धी बंधूंना ‘दे माय धरणी ठाय’ करुन सोडल्यामुळे शंभू राजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करण्याचे धाडस कोणातही झाले नाही. पातशहा औरंगजेब त्याच्या पाच लाख फौजेनिशी महाराष्ट्रावर चालून आल्यावर त्याच्याशी सलग आठ वर्षे राजांनी कडवी झुंज दिली, पण शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्वपुर्ण किल्ला (गड) किंवा आपल्या आरमारतील एकही जहाज शंभूराजांनी गमावले नाही.
प्रभू श्रीरामचंद्रांसारखा, जंजीरा जिंकण्यासाठी संभाजी राजे आणि त्यांच्या मावळ्यांनी बांधलेला सेतू |
शंभू राजांची फक्त तलवारच सप् सप् चालायची नाही तर त्यांची लेखाणीही अतिशय धारदार होती. एक पराक्रमी सेनानी आणि विचारी कवी ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे शंभू राजे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शंभू राजांनी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. नखशिख, नायिकाभेद आणि सातशातक ही ग्रंथसंपदा सुद्धा संस्कृत आणि ब्रज भाषेवर ही प्रभुत्व असलेल्या शंभूराजांचीच.
संगमेश्वर येथे एक बैठकी दरम्यानं संभाजी राजांचा मेहुणे गणोजी शिर्के ह्याच्या बंडाळीमुळे संभाजीराजे व त्यांचे परममित्र कवी कलश औरंगजेबाच्या कैदेत सापडले. औरंगजेबाने शंभूराजांना सर्व किल्ले स्वतःच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले असतानाही शंभू राजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने शंभू राजे आणि कवी कलश यांची मरतुकड्या उंटावरुन विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली परंतु शंभू राजांनी शरणागती पत्करली नाही. औरंगजेबाने क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिल्यामुळे जवळपास ४० दिवसांपर्यंत राजांना असह्य वेदना देण्यात आल्या पण राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. शंभू राजे आणि कवी कलश दोघांचेही डोळे तप्त लाल सळीने फोडले गेले. शंभू राजांची कातडी सोलून, हाल-हाल करुन मारण्यात आले. राजांना न्यायला आलेला मृत्यू देखील ओशाळला पण राजांनी त्यांची तत्वं अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही.
एका रणधुरंधर सेनानीचा वध झाला, पण गप्प राहतील ते मावळे कसले. महाराष्ट्रासह दक्षिण भारत जिंकायला आलेल्या औरंगजेबाला शंभू राजांच्या एकनिष्ठ धनाजी आणि संताजी घोरपडे आणि इतर मावळ्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्येच गाडले. आणि स्वराज्याचे भगवे झेंडे अटकेपार रोवले. शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि त्यावर कळस चढवायचे काम संभाजी राजे आणि पेशव्यांनी केले.
‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा...’
स्वराज्यरक्षणाची आग मावळ्यांमधे सतत धगधगत ठेवणार्या स्वराज्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा...
Reference -
Sambhaji Book by Vishwas Patil
Internet