पुन्हा एकदा घुमणार 'कबड्डी-कबड्डी', 'ले पंगा', 'घे ऊचल', 'India... India' चे सूर. अनुभवायला मिळणार तो थरार, शिगेला पोहोचणार ती उत्कंठा आणि रोखले जाणार श्वास पुन्हा एकदा. कारण... कारण आठवढ्याभरातच म्हणजे येत्या ७ ऑक्टोबर २०१६ पासून अहमदाबाद, गुजरात येथे सुरु होतोय भारताच्या मातीतल्या अस्सल रांगड्या खेळाचा - कबड्डीचा महामेळा...! कबड्डी वर्ल्डकप - २०१६. 'आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन'ची मान्यता लाभलेल्या ह्या वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भूषवतोय आपला 'भारत' देश. तमाम भारतीयांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब आहे की भारतीय पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ अगोदर झालेल्या सर्व वर्ल्डकप स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरलेले आहेत. आपण ह्या अगोदर कबड्डी खेळाविषयी माझ्या 'ले पंगा - कबड्डी' ह्या लेखातून माहिती घेतलीच आहे; आता ह्या लेखातून आपण कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेविषयी माहिती घेऊ.
यंदाच्या कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेत भारतासह अजून ११ देशांचा सहभाग आहे. ह्या १२ संघांचे 'अ' आणि 'ब' अश्या दोन गटात विभाजन केले गेले आहे.
कबड्डी वर्ल्डकप - २०१६ |
यंदाच्या कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेत भारतासह अजून ११ देशांचा सहभाग आहे. ह्या १२ संघांचे 'अ' आणि 'ब' अश्या दोन गटात विभाजन केले गेले आहे.
'अ' गट | 'ब' गट |
भारत | इराण |
बांग्लादेश | संयुक्त राष्ट्र |
इंग्लंड | पोलंड |
ऑस्ट्रेलिया | केनिया |
दक्षिण कोरिया | थायलंड |
अर्जेंटिना | जपान |
भारताचा समावेश 'अ' गटात असून ह्या गटात भारताला 'बांग्लादेश', 'इंग्लंड', 'ऑस्ट्रेलिया', 'दक्षिण कोरिया' आणि 'अर्जेंटिना'चे कडवे आव्हान आहे. स्पर्धेत प्रत्येक गटातील संघ त्या त्या गटांतील प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध साखळी (लीग) सामन्यांत प्रत्येकी एकदा (Round-Robin Format) खेळेल. आणि साखळी सामन्यांत सर्वाधिक गुण मिळविलेले दोन्ही गटांतील दोन संघ उपांत्य सामन्यांत (Knock-out Format) आमनेसामने येतील आणि उपांत्य सामने जिंकणारे दोन संघ अंतिम सामन्यांत परस्परांसोबत झुंज देतील. हे सर्व सामने अहमदाबाद, गुजरात येथील 'ट्रान्सस्टेडिया' या क्रीडासंकुलात 'मॅटवर' खेळविले जातील. यंदाच्या कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेत 'ऑस्ट्रेलिया', 'केनिया', 'पोलंड', 'अर्जेंटिना' आणि 'संयुक्त राष्ट्र' (US) हे देश प्रथमच सहभागी होत आहेत.
दिनांक | सामने | वेळ |
शुक्रवार, ७ ऑक्टोबर २०१६ | भारत वि. दक्षिण कोरिया | रात्रौ ८:०० वाजता |
शनिवार, ८ ऑक्टोबर २०१६ | भारत वि. ऑस्ट्रेलिया | रात्रौ ९:०० वाजता |
मंगळवार, ११ ऑक्टोबर २०१६ | भारत वि. बांग्लादेश | रात्रौ ९:०० वाजता |
शनिवार, १५ ऑक्टोबर २०१६ | भारत वि. अर्जेंटिना | रात्रौ ९:०० वाजता |
मंगळवार, १८ ऑक्टोबर २०१६ | भारत वि. इंग्लंड | रात्रौ ९:०० वाजता |
भारताच्या साखळी (लीग) सामान्यांतील लढती
१४ सप्टेंबर २०१६ रोजी भारताचे युवक कल्याण आणि क्रिडामंत्री 'विजय गोयल' ह्यांनी कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेच्या अधिकृत लोगो (Official Logo) चे अनावरण केले.
कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेचा अधिकृत लोगो (Official Logo) |
'चपळाई' आणि 'प्रतिस्पर्ध्यावरची मजबूत पकड' असलेल्या 'सिंहाची' प्रतिमा लोगो म्हणून कबड्डी खेळाला साजेशी आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे नेतृत्व करतो आहे अनुभवी कबड्डीपट्टू 'अनुपकुमार'. भारताचा संघ सर्व बाजूंनी समतोल वाटतोय कारण अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या 'प्रो-कंबड्डी लीग' मध्ये चमकदार कामगिरी केलेले अनेक खेळाडू ह्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे निश्चितच सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल.
भारतीय क्रीडाप्रेमी खेळाचे अस्सल चाहते आहेत, त्यामुळे भारतासह अन्य देशातील खेळाडूंना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल ह्यांत शंकाच नाही. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत आपली मक्तेदारी अबाधित राखण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करुन पुन्हा एकदा वर्ल्डकप उंचविण्यासाठी 'भारतीय कबड्डी संघाला' मनःपूर्वक शुभेछया.