Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 10:54 AM | No comments

कबड्डी वर्ल्डकप - २०१६

पुन्हा एकदा घुमणार 'कबड्डी-कबड्डी', 'ले पंगा', 'घे ऊचल', 'India... India' चे सूर. अनुभवायला मिळणार तो थरार, शिगेला पोहोचणार ती उत्कंठा आणि रोखले जाणार श्वास पुन्हा एकदा. कारण... कारण आठवढ्याभरातच म्हणजे येत्या ७ ऑक्टोबर २०१६ पासून अहमदाबाद, गुजरात येथे सुरु होतोय भारताच्या मातीतल्या अस्सल रांगड्या खेळाचा - कबड्डीचा महामेळा...! कबड्डी वर्ल्डकप - २०१६. 'आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन'ची मान्यता लाभलेल्या ह्या वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भूषवतोय आपला 'भारत' देश. तमाम भारतीयांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब आहे की भारतीय पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ अगोदर झालेल्या सर्व वर्ल्डकप स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरलेले आहेत. आपण ह्या अगोदर कबड्डी खेळाविषयी माझ्या 'ले पंगा - कबड्डी' ह्या लेखातून माहिती घेतलीच आहे; आता ह्या लेखातून आपण कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेविषयी माहिती घेऊ.

कबड्डी वर्ल्डकप - २०१६
 
यंदाच्या कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेत भारतासह अजून ११ देशांचा सहभाग आहे. ह्या १२ संघांचे '' आणि '' अश्या दोन गटात विभाजन केले गेले आहे.

'अ' गट 'ब' गट
भारत इराण
बांग्लादेश संयुक्त राष्ट्र
इंग्लंड पोलंड
ऑस्ट्रेलिया केनिया
दक्षिण कोरिया थायलंड
अर्जेंटिना जपान

भारताचा समावेश 'अ' गटात असून ह्या गटात भारताला 'बांग्लादेश', 'इंग्लंड', 'ऑस्ट्रेलिया', 'दक्षिण कोरिया' आणि 'अर्जेंटिना'चे कडवे आव्हान आहे. स्पर्धेत प्रत्येक गटातील संघ त्या त्या गटांतील प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध साखळी (लीग) सामन्यांत प्रत्येकी एकदा (Round-Robin Format) खेळेल. आणि साखळी सामन्यांत सर्वाधिक गुण मिळविलेले दोन्ही गटांतील दोन संघ उपांत्य सामन्यांत (Knock-out Formatआमनेसामने येतील आणि उपांत्य सामने जिंकणारे दोन संघ अंतिम सामन्यांत परस्परांसोबत झुंज देतील. हे सर्व सामने अहमदाबाद, गुजरात येथील 'ट्रान्सस्टेडिया' या क्रीडासंकुलात 'मॅटवर' खेळविले जातील. यंदाच्या कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेत 'ऑस्ट्रेलिया', 'केनिया', 'पोलंड', 'अर्जेंटिना' आणि 'संयुक्त राष्ट्र' (US) हे देश प्रथमच सहभागी होत आहेत.

दिनांक सामने वेळ
शुक्रवार, ७ ऑक्टोबर २०१६ भारत वि. दक्षिण कोरिया रात्रौ ८:०० वाजता
शनिवार, ८ ऑक्टोबर २०१६ भारत वि. ऑस्ट्रेलिया रात्रौ ९:०० वाजता
मंगळवार, ११ ऑक्टोबर २०१६ भारत वि. बांग्लादेश रात्रौ ९:०० वाजता
शनिवार, १५ ऑक्टोबर २०१६ भारत वि. अर्जेंटिना रात्रौ ९:०० वाजता
मंगळवार, १८ ऑक्टोबर २०१६ भारत वि. इंग्लंड रात्रौ ९:०० वाजता
  
भारताच्या साखळी (लीग) सामान्यांतील लढती

१४ सप्टेंबर २०१६ रोजी भारताचे युवक कल्याण आणि क्रिडामंत्री 'विजय गोयल' ह्यांनी कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेच्या अधिकृत लोगो (Official Logo) चे अनावरण केले.
कबड्डी वर्ल्डकप - २०१६ स्पर्धेचा अधिकृत लोगो (Official Logo)

'चपळाई' आणि 'प्रतिस्पर्ध्यावरची मजबूत पकड' असलेल्या 'सिंहाची' प्रतिमा लोगो म्हणून कबड्डी खेळाला साजेशी आहे. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे नेतृत्व करतो आहे अनुभवी कबड्डीपट्टू 'अनुपकुमार'. भारताचा संघ सर्व बाजूंनी समतोल वाटतोय कारण अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या 'प्रो-कंबड्डी लीग' मध्ये चमकदार कामगिरी केलेले अनेक खेळाडू ह्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे निश्चितच सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल.

भारतीय क्रीडाप्रेमी खेळाचे अस्सल चाहते आहेत, त्यामुळे भारतासह अन्य देशातील खेळाडूंना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल ह्यांत शंकाच नाही. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत आपली मक्तेदारी अबाधित राखण्यासाठी आणि उत्तम कामगिरी करुन पुन्हा एकदा वर्ल्डकप उंचविण्यासाठी 'भारतीय कबड्डी संघाला' मनःपूर्वक शुभेछया.



हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
हेंचि माझी सर्व जोडी
माझी सर्व जोडी, हेंचि माझी सर्व जोडी

रती लिहिलेली संत तुकाराम महाराजांची रचना आपल्यापैकी अनेकांनी गणपती बाप्पाची आरती करून झाल्यावर घेण्यात येणाऱ्या भजनात म्हटली असेलच... ही स्वर्गीय रचना, त्याची चाल ऐकताना आपले मन नकळत 'त्या' परमेश्वराशी जोडले जाते. ह्या अप्रतिम रचनेला आपल्या सुमधुर आणि अजरामर संगीताने स्वरबद्ध केलं ते श्रीनिवास विनायक खळे (खळे काका) यांनी. भावगीतं असो की भक्तीगीतं, चित्रपटगीतं असो की स्फूर्तिगीतं, प्रेमगीतं असो की बालगीतं, नाट्यगीत असो की लावणी अश्या एक-ना-अनेक प्रकारच्या गीतांना खळे काकांनी आपल्या सुरेल, सुमधुर संगीताने स्वरबद्ध केले आहे. आणि म्हणूनच एक रिपक्व आणि सर्वांगपरिपूर्ण संगीतकार ही बिरुदं खळे काकांना अगदी चपखल बसतील.

श्रीनिवास विनायक खळे (खळे काका)

खळे काकांचा जन्म ३० एप्रिल १९२६ साली मुंबईचा. वडील बडोदा, गुजरात येथे नोकरीला असल्याने खळे काकांचे बालपण तिथेच गेलं. बडोद्यातील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयातून गाण्याचे प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि पंडित मधुसूदन जोशी, उस्ताद फैय्याज खाँ, निसार हुसैन खाँ, गुलाम रसूल अश्या दिग्गजांच्या तालिमीत खळे काकांनी संगीताचे धडे गिरविले. खळे काकांचा शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम होता. "मला शास्त्रीय गायक व्हायचं होतं, जन्मात कधी सुगम संगीताकडे जाईन असं वाटलं नव्हतं" असं खुद्द खळे काकांनीच म्हटलं आहे.

पण आयुष्यात एक घटना घडली आणि एक संगीतकार म्हणून खळे काकांचा प्रवास सुरु झाला. ते घडले असे की, एकदा खळे काकांच्या भावाचे मित्र एक ग. दि. माडगूळकरांचे गाणं घेऊन घरी आले आणि म्हणाले, "ह्या गाण्याला तू चाल कर." त्यावर खळे काका म्हणाले, "अहो चाल करणं वेगळं आहे आणि गाणं वेगळं आहे; मला नाही करता येणार." त्यावर ते मित्र म्हणाले की, "काय तू इतकं क्लासिकल गातोस; तुला चाल नाही करता येत?" खळे काका त्या मित्राला म्हणतात "ते वेगळं आहे नाना, मला नाही जमणार ते." तेव्हा ते मित्र काकांना म्हणतात की, "तू प्रयत्न तर कर?" आणि काकांनी त्यांच्या आयुष्यातलं ते पहिलं गाणं संगीतबद्ध केलं.

खळे काकांचे वडील हे बालगंधर्वांचे चाहते. खळे काकांचे बालपणीचे गायन ऐकून बालगंधर्व त्यांच्या वडीलांना म्हणाले, "हा मुलगा मला द्या, हा मोठा गायक होईल." तेव्हा काकांचे वडील म्हणाले की, "मला मुलाला नाटक्या नाही करायचं." 'पेशा' नाही तर 'छंद' म्हणून गाणं-वाजवणं हे खळे काकांच्या वडिलांना मान्य होतं. पण काकांना तर आयुष्यात संगीताशिवाय दुसरं काहीच करायचं नव्हतं. संगीताच्या ध्यासापायी  अनेक उत्तमोत्तम नोकऱ्यांचा त्याग खळे काकांनी केला. आणि नशीब आजमावयाला म्हणून एकदा घरातून पळून ते मुंबईला आले. जिद्द, कष्टाची तयारी, स्वतःच्या गुणवत्तेवरचा दुर्दम्य विश्वास, प्रतिभेचे पंख आणि परमेश्वरावरची अढळ श्रद्धा ह्यांच्या जोरावर खळे काकांनी संगीतप्रेमी रसिकांची मनं जिंकून घेतली ती कायमची.

ह्याच महिन्यांत म्हणजेच २ सप्टेंबर २०१६ रोजी खळे काकांची पाचवी पुण्यतिथी झाली. त्यांच्या संगीताची मोहिनी आजही समस्त संगीतप्रेमींच्या मनावर गारुड करुन आहे व या पुढेही ती अशीच निरंतर राहील ह्यांत तिळमात्र शंका नाही. खळे काकांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ह्या लेखमालिकेतून आपाल्याला माहिती देण्याचा प्रयास, प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा नक्कीच आवडेल. 


संदर्भ:- नक्षत्रांचे देणे कार्यक्रम.


Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 11:41 AM | 1 comment

द हंगर गेम्स - (भूक)

हानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड आहे. बरीचशी पुस्तकं, कदंबऱ्या वाचनात आल्या आहेत. त्यातली काही मनात घर करुन गेली आहेत. आठवडयापूर्वीच वाचलेली 'द हंगर गेम्स' ही सुझान कॉलिंस ह्यांनी लिहिलेली आणि सुमिता बोरसे ह्यांनी अनुवादित केलेली त्यामधलीच एक अविस्मरणीय कदंबरी... नावाप्रमाणेच ही वाचकाची वाचनाची भूक वाढवत नेऊन त्याला अक्षरशः झपाटून टाकते. एकदा वाचायला घेतलेली कादंबरी खाली ठेवावी असे वाटतच नाही.


ही काल्पनिक गोष्ट आहे 'पनामा' देशातील १२ नंबरच्या डिस्ट्रिक्ट्मध्ये राहणाऱ्या १६ वर्षाच्या 'कॅटनीस एव्हरडीन' आणि 'पीटा मेलार्क' ह्यांची. ह्या देशात साधारणपणे १२ लहानमोठी डिस्ट्रिक्ट्स आहेत. त्यापैकी काही डिस्ट्रिक्ट्स ही एवढी गरीब आहेत, की त्या डिस्ट्रिक्ट्स मधील लोकांना साधं दोन वेळीचं अन्नसुद्धा मिळत नाही आणि कधीकधी तर ते खूप प्रयास करुन मिळवावे लागते. १२ नंबरच्या डिस्ट्रिक्ट्ची व्यथा याहून वेगळी नाही. इथे होणाऱ्या मृत्यूला उपासमारी हेच मुख्य कारण आहे. इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय 'खाणकाम' हा आहे. १८ व १८ वर्षाखालील प्रत्येकाला दरवर्षी त्यांचे शिधापत्रिकेत नाव नोंदवावे लागते. असे केल्यास त्यांना सरकारकडून दर महिना मोफत शिधा वाटली जाते. पण ही शिधा जेमतेम २/३ दिवस पुरेल एवढीच असते. मग महिन्याचे उरलेले दिवस त्यांना १ वेळ खाऊन वा कधीकधी उपाशी राहून ढकलावे लागतात.

देशात दरवर्षी 'हंगर गेम्स' नावाची एक अत्यंत क्रूर स्पर्धा TV वर प्रसारित होत असते. शिधापत्रिकेत नावाची नोंद असलेल्या १८ वर्षाखालील मुलामुलींना ह्यांत भाग घेणे बंधनकारक आहे. सर्व डिस्ट्रिक्ट्स मधून प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन स्पर्धक चिठ्ठया काढून निवडले जातात. २४ स्पर्धकांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेचा असा नियम आहे की, स्पर्धकाने इतर प्रतिस्पर्धी स्पर्धकांना मारुन टाकायचे आणि त्याने स्वतः कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत जिवंत राहायचे. (Survive in any situation and condition) जो/जी स्पर्धक शेवटपर्यंत जिवंत राहील तो/ती त्या वर्षीच्या 'हंगर गेम्स' स्पर्धेचा विजेता/विजेती ठरेल. विजेत्या स्पर्धकाचा यथायोग्य सत्कार आयोजक करतात आणि त्याची व त्याच्या संपूर्ण परिवाराच्या अन्न, वस्त्र आणि निवारा हया मूलभूत गरजाची जबाबदारी आयोजक (सरकार) स्वतः घेतात. प्रेक्षक ह्या स्पर्धेत कोणता स्पर्धक जिंकेल यावर भरपूर सट्टा खेळतात, तर आयोजक स्पर्धकांना बाहुल्यासारखे आपल्या तालावर नाचवून एकमेकांविरुद्ध लढायाला भाग पाडतात. स्पर्धेच्या आधी सर्व स्पर्धकांना स्पर्धा जिंकण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. 

आपल्या लहान मुलामुलींना ह्यांत जीव गमावताना बघणे खूप त्रासदायक असल्यामुळे काही डिस्ट्रिक्ट्स मध्ये स्पर्धेविषयी खूप चीड आहे. तर काही डिस्ट्रिक्ट्मध्ये ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी व त्यात जिंकण्यासाठी खेळाडूंची तयारी करुन घेतली जाते. ७४ व्या 'हंगर गेम्स' स्पर्धेसाठी १२ नंबरच्या डिस्ट्रिक्ट्मधून कॅटनीसची लहान बहीण 'प्रिमरोज' ची निवड झाली आहे. कॅटनीसचे 'प्रिम'वर खुप प्रेम असल्याने व प्रिम खूप लहान असल्यामुळे कॅटनीस स्वतः ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी जाते. कॅटनीस सोबत पीटा मेलार्क या मुलाची सुद्धा निवड होते. या पीटाचे कॅटनीसवर एकतर्फी प्रेम आहे.

स्पर्धा ऐन रंगात आली असताना आयोजकांकडून स्पर्धेच्या मूळ नियमांमध्ये बदल केला जातो. आता एक विजेता / विजेती ठरण्याऐवजी "एकाच डिस्ट्रिक्ट मधली जोडी विजयी ठरु शकते" असे ठरते. आपल्या बुद्धिचातुर्याने आणि अंगी असलेल्या विशेष कौशल्याने कॅटनीस खेळात जखमी झालेल्या पीटाला जंगलातून शोधते, व ते दोघेही ह्या स्पर्धेत विजयी होतात. कॅटनीस व पीटाकडे विशेष कौशल्य आहे जे त्यांना स्पर्धा जिंकायला मदत करते. ही स्पर्धा एका जंगलात खेळावली गेली असल्याने 'जंगलातील स्पर्धकांचे वास्तव्य', 'लढाई', 'डावपेच' आणि 'एका ११ ते १२ वर्षाच्या स्पर्धकाच्या मृत्युनंतर कॅटनीसच्या मनात स्पर्धेविषयी असलेली नाराजी' असे अनेक प्रसंग लेखकाने अक्षरशः डोळ्यासमोर उभे केले आहेत. कथेला वेग आणि दिशा असल्याने ती आपल्या समोर घडते आहे असे वाचकाला वाटल्याशिवाय राहत नाही. एक दर्जेदार कथा वाचायला दिल्याबद्दल लेखकांचे मनःपूर्वक आभार. ही कादंबरी वाचताना "रिकामी पोट माणूसाला काय काय करायला भाग पडू शकते ?" ह्याची प्रकर्षाने जाणीव होते.

ही कादंबरी वाचल्यावर काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग मला आठवाला. मी लोकलने घरी येत होतो. मी उतरायच्या दोन स्टेशन अगोदर एक माणूस माझ्या डब्यात शिरला. एकंदर त्याचा अवतारावरुन तो खूप गरीब वाटत होता. माझ्या समोरच्याच सीटवर तो बसला. खूप भूक लागली असल्याने तो थकलेला वाटत होता. त्याची नजर 'डब्यात काही खायला मिळते का ?' ह्याचा शोध घेत होती. अचानक त्याला कोणा व्यक्तिने सीटखाली फेकून दिलेली एक पिशावी दिसली, त्याने पटकन ती पिशावी उचलली व त्यातले खाऊ लागला. मला ते बघून खूप वाईट वाटले, कारण त्या पिशवीत सडलेली ७/८ द्राक्ष होती. त्या द्राक्षांचा चांगला भाग तो खात होता. मी कधीच स्वतःजवळ काही खायला ठेवत नाही मात्र नेमका त्यादिवशी माझ्या बॅगमध्ये मला आत्याने दिलेला बिस्किटचा पुडा होता. मला अजिबात राहावले नाही, मी लगेच तो बिस्किटचा पुडा त्याला दिला व त्याने तो घेतला देखील. मला खूपच बरे वाटले. मी देखील माझे उतरण्याचे स्टेशन आल्यावर उतरलो. खरच भूक माणसाच्या मनावर खूप वेगळा परिणाम करते. भुकेल्यांना 'अन्नदान' करुन आपण त्यांना नक्कीच मदत करु शकतो. तसेच लग्न वा इतर सण-समारंभात आवश्यक आहे तेवढेच अन्न घेऊन अन्नाचा अपव्यय टाळू शकतो.

शेवटी आपले 'आयुष्य' ही देखील एक स्पर्धाच आहे. जीवनात येणाऱ्या लहानमोठया घरघुती, वैयक्तिक, सामाजिक, वैवाहिक, आरोग्यीक आणि इतर लहान-मोठ्या अडचणी आणि आव्हानं म्हणजे 'खेळ'. परंतु बऱ्याचदा खेळ एकटयाने जिंकणे कठीण होऊन बसते. वर सांगितलेल्या आयुष्याच्या खेळात आपल्याला जर त्या खेळातला 'उत्तम सोबती' (सहस्पर्धक) आणि 'योग्य प्रशिक्षक' (सदगुरु / परमेश्वरी अधिष्ठान) मिळाले तर त्या खेळात आपली कामगिरी उत्तम आणि उल्लेखनीय होतेच आणि ही कामगिरी व  आत्मविश्वास आपल्याला ती स्पर्धा जिंकण्यासाठी खूप महत्वाची ठरते. आपण फक्त आपला नियमित 'सराव' (उपासना) नियमित सुरु ठेवला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या  भक्तीची भूक वाढविण्यास मदत होईल.

बापूला माझ्या प्रेमाची तहान
बापूला माझ्या भक्तीचीच 'भूक'
 


संदर्भ:
१.  'द हंगर गेम्स' कादंबरी (सुझान कॉलिंस लिखित आणि सुमिता बोरसे अनुवादित)

Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 11:03 AM | 1 comment

श्रावण

ज निर्सगाचा नूर काही औरच होता. डोळे किलकिले करुन बाहेर बघतो तर मस्तपैकी मुसळधार पाऊस कोसळत होता आणि मला अंगावर चादर ओढून झोपून त्याची मजा लूटण्याचा मोह अनावर झाला होता. ऐवढ्यात आईची हाक आली, अरे विनू उठ सात वाजले... थोडा वेळ तसाच लोळत राहीलो. माझ्या बाबांचा रोज सकाळी झोपेतून जाग आली की सकाळचे नित्यक्रम करताना सकाळी सकाळी रेडीओ (आकाशवाणी) लावण्याचा नेहमीचा शिरस्ता. तेव्हा आकाशवाणीवरच्या त्या जुन्या हिंदी गाण्याचे शब्द माझ्या कानांवर पडताच आळस आणि मनावर आलेली मरगळ लगेच नाहीशी झाली.

सावन का महिना, पवन करे सोर
जियारा रे झूमें ऐसे जैसे बनमां नाचे मोर

खरचं ह्या श्रावण महिन्याची जादू काही वेगळीच आहे. जेव्हा वरुण राजा सकल सृष्टीवर आपल्या जलधारांची मुक्त हस्ते उधळण करित असतो, वसुंधरेला पुन्हा एकदा हिरवीगार आणि सुपिक बनवित असतो; तेव्हा वरुण राजाच्या सोबत हातात हात गुंफीत सगळ्यांना भरभरुन आनंद देण्यासाठी ‘श्रावण’ महिना जणू आतुरच झालेला असतो. पाऊस ऐन बहरत असताना श्रावण महिन्याचे आगमन होते. ह्या काळात निसर्ग आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या छटा दाखवित असतो आणि त्याचे अनामिक सौंदर्य मनावर भुरळ पाडत असते, जणू देवलोकीचा स्वर्गच जमिनीवर उतरलेला असतो.

श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा
उलघडला झाडांतून अवचित, हिरवा मोरपिसारा

श्रावण महीना म्हणजे ‘सणांचा राजा’ असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हिंदू संस्कृतीतील अनेक सण श्रावण महिन्यांत येतात. आध्यात्मिक प्रगती, पवित्र व्रत आणि उपासनेसाठी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण महिन्याचा वरचा क्रमांक आहे. सुर्याचा सिंह राशीत प्रवेश होत असताना श्रावण महिन्याची सुरुवात होते. पुराणांमध्ये संदर्भ सापडतो की, ह्या श्रावण महिन्याच्या काळात जेव्हा देव आणि दानव ह्यांच्यात समुद्रमंथन झाले. ह्या समुद्रमंथनाच्या वेळी ‘अमृत’ आणि ‘हलाहल’ (विष) तयार झाले. त्यातील ‘अमृत’ हे समस्त देवांनी प्राशन केले तर ‘हलाहल’ हे ‘परमशिव’ ह्यांनी प्राशन केले. हलाहल प्राशन करताच परमशिव ह्यांचा कंठ निळा दिसू लागला, म्हणून परमशिवाला ‘निळकंठ’ असे नामाभिदान प्राप्त झाले. ह्या हलाहलचा प्रभाव कमी करण्यासाठी महादेवाने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आणि ‘गंगा’ मातेला धारण केले. त्यामुळे हलाहलाचा प्रभाव कमी झाला. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ आणि पवित्र मानला जातो कारण श्रावणातील प्रत्येक दिवसला त्याचे त्याचे विशेष महत्व आहे.

सोमवार - शिवपूजन
मंगळवार - मंगळागौरी पूजन
बुधवार - बुधपूजन
गुरुवार - बृहस्पती पूजन
शुक्रवार - जरा-जिवंतिका पूजन
शनिवार - अश्वत्थमारुती पूजन
रविवार - आदित्यपूजन

श्रावण महिन्यातील सोमवार हा ‘श्रावणी सोमवार’ म्हणून ओळखला जातो. ‘श्रावणी सोमवारी’ महादेवाच्या पिंडीवर दूध, जल आणि विविध धान्यांचा अभिषेक करुन ‘शिव पूजन’ केले जाते. अनेक जण सोमवरी उपवास करतात तसेच, सोळा श्रावणी सोमवारांचे व्रत देखील करतात. श्रावणातील मंगळवारी माता पार्वतीचे स्मरण करुन ‘मंगळागौरी पूजन’ केले जाते. प्रामुख्याने स्त्रीयांचा ह्या पूजनात सहभाग असतो. फुगड्या घालत व फेर धरुन नाचत आईच्या प्रतिमेसमोर स्त्रीया मंगळागौरीचे विविध खेळ खेळतात आणि मंगळागौरीची रात्र जागवितात. नव-विवाहीत युवतींसाठी मंगळागौरी पूजन म्हणजे जणू आनंद आणि उत्साहाची पर्वणीच असते. ह्या दिवशी पंचपक्वानांचा बेत देखील आखला जातो. श्रावणातील बुधवारी ‘बुध पूजन’ करण्यात येते, तर व्याधींमधून मुक्त होण्यासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी श्रावणातील गुरुवारी ‘बृहस्पती पूजन’ करण्यात येते. श्रावण महिन्यातील शुक्रवारी विवाहित जोडपी माता जिवंतिकेला संतानप्राप्तीसाठी व रक्षणासाठी साकडे घालतात व ‘जिवंतिका पूजन करतात. स्कंद पुराणांत माता ‘जिवंतिका’ आणि ‘जरा-जिवंतिका’ पूजनाचा महीमा वर्णिला आहे. ज्याच्या बलापुढे मांदार पर्वतही अणूच्या कणाएवढा आहे अश्या महारुद्र हनुमंताचे ‘मारुती पूजन’ श्रावणातील शनिवारी करण्यात येते, तर सुर्य नारायणाचे ‘आदित्यपूजन’ श्रावणातील रविवारी करण्यात येते.

श्रावण हा जास्तीत जास्त श्रवणभक्ती करण्याचा महिना आहे. श्रवणभक्ती म्हणजे शुभ, पवित्र ऐकणे (स्तोत्र, मंत्र) आणि मनांत सतत स्मरण करुन तोंडाने त्यांचा उच्चार करणे. श्रावणात अधिकाधिक श्रावणभक्ती करणे श्रेयस्कर असते. परमेश्वर आपल्याला ह्या श्रवणभक्तीचे विपुल प्रमाणात फल फळ देतोच. परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापूंच्या आशिर्वादाने आणि सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टच्या विद्यमाने दरवर्षी अखंड श्रावणमांस “श्री घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण” करण्यात येते. आपण देखील ह्या स्तोत्र पठणात सहभागी होऊन शुभ स्पंदने मिळवू शकतो आणि आपली आध्यात्मिक प्रगती करु शकतो.




घोरकष्टोध्दरण स्तोत्राचे पठण, बुधवार दिनांक ३ ऑगस्ट २०१६ ते गुरुवार दिनांक १ सप्टेंबर २०१६ पर्यंत होणार आहे.




पत्ता

श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग, ऑफ एस्‌.एस्‌. वाघ मार्ग,

चित्रा सिनेमा समोर, गुरुद्वारा जवळ, नायगाव,

दादर (पूर्व), मुंबई - ४०० ०१४.



वेळ:

गुरुवार सोडुन इतर दिवशी,

सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत व

संध्याकाळी ५:३० ते रात्रौ ९:००



गुरुवारी, सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत व

दुपारी ४:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत



संदर्भ: इंटरनेट
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 3:07 PM | 1 comment

​संभाजी राजे

संभाजी राजे... हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. धर्मवीर, रणधुरंधर, सिंहाचा छावा, कर्तव्यदक्ष अश्या उपमांची रत्न साहित्याच्या खजिन्यातून रिती केली तरी शंभू राजांच्या किर्तीच्या तराजूत त्यांचे वजन तूसभरही भरणार नाही. त्यांची किर्ती त्याही पेक्षा वर आहे.

छत्रपती संभाजी राजे

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...’ त्याप्रमाणेच शंभू राजे लहानपनापासून अतिशय हुशार, तल्लख बुद्धी आणि आरसपाणी सौंदर्यांचे दैवी वरदान लाभलेले. अंगमेहनतीच्या जोरावर शंभू राजांनी उत्तम शरीरयष्टी देखील कमावली होती. पुरंदराच्या तहानुसार जेव्हा शिवाजी महाराजांना आग्र्याला जाणे भाग होते, तेव्हा वयाच्या अवघ्या नऊ-दहा वर्षांच्या शंभूराजांनाही आग्र्याला जावे लागले. महाराजांच्या अनुपस्थितीत बाळ शंभू राजे औरंगजेबाच्या दरबारात उपस्थिती लावत होते. नेतृत्व, राजकारणांतील बारकावे, रणांगणातील डावपेच, कमालीची हुशारी आणि मुत्सद्दीपणा शंभूराजांकडे असल्यामुळे दरबारात त्यांच्याशी चर्चा करताना भल्याभल्यांच्या नाकी नऊ येत असे.

शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर अवघ्या तेविस-चोविस वर्षांच्या शंभू राजांनी स्वराज्याची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेतली. कौटुंबिक कलह, अष्ट्प्रधान मंडळीतील अनेकांची स्वराज्यद्रोहाची बंडाळी आणि परकीय शत्रूंच्या वाढत्या हालचालींना शंभू राजांनी आपल्या बाहूंच्या जोरावर रोखून धरले. आपल्या अल्पशा मावळ्यांना त्यांनी वानर सेनासागराप्रमणे तयार केले होते. गोव्याचे पोर्तुगीज, म्हैसूरचा चिक्कदेवराय राजा आणि जंजीर्‍याच्या सिद्धी बंधूंनादे माय धरणी ठाय’ करुन सोडल्यामुळे शंभू राजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करण्याचे धाडस कोणातही झाले नाही. पातशहा औरंगजेब त्याच्या पाच लाख फौजेनिशी महाराष्ट्रावर चालून आल्यावर त्याच्याशी सलग आठ वर्षे राजांनी कडवी झुंज दिली, पण शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्वपुर्ण किल्ला (गड) किंवा आपल्या आरमारतील एकही जहाज शंभूराजांनी गमावले नाही.

प्रभू श्रीरामचंद्रांसारखा, जंजीरा जिंकण्यासाठी संभाजी राजे आणि त्यांच्या मावळ्यांनी बांधलेला सेतू

शंभू राजांची फक्त तलवारच सप् सप् चालायची नाही तर त्यांची लेखाणीही अतिशय धारदार होती. एक पराक्रमी सेनानी आणि विचारी कवी ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे शंभू राजे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शंभू राजांनी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. नखशिख, नायिकाभेद आणि सातशातक ही ग्रंथसंपदा सुद्धा संस्कृत आणि ब्रज भाषेवर ही प्रभुत्व असलेल्या शंभूराजांचीच.

संगमेश्वर येथे एक बैठकी दरम्यानं संभाजी राजांचा मेहुणे गणोजी शिर्के ह्याच्या बंडाळीमुळे संभाजीराजे व त्यांचे परममित्र कवी कलश औरंगजेबाच्या कैदेत सापडले. औरंगजेबाने शंभूराजांना सर्व किल्ले स्वतःच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले असतानाही शंभू राजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने शंभू राजे आणि कवी कलश यांची मरतुकड्या उंटावरुन विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली परंतु शंभू राजांनी शरणागती पत्करली नाही. औरंगजेबाने क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिल्यामुळे जवळपास ४० दिवसांपर्यंत राजांना असह्य वेदना देण्यात आल्या पण राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. शंभू राजे आणि कवी कलश दोघांचेही डोळे तप्त लाल सळीने फोडले गेले. शंभू राजांची कातडी सोलून, हाल-हाल करुन मारण्यात आले. राजांना न्यायला आलेला मृत्यू देखील ओशाळला पण राजांनी त्यांची तत्वं अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही.

एका रणधुरंधर सेनानीचा वध झाला, पण गप्प राहतील ते मावळे कसले. महाराष्ट्रासह दक्षिण भारत जिंकायला आलेल्या औरंगजेबाला शंभू राजांच्या एकनिष्ठ धनाजी आणि संताजी घोरपडे आणि इतर मावळ्यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्येच गाडले. आणि स्वराज्याचे भगवे झेंडे अटकेपार रोवले. शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि त्यावर कळस चढवायचे काम संभाजी राजे आणि पेशव्यांनी केले.

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा...

स्वराज्यरक्षणाची आग मावळ्यांमधे सतत धगधगत ठेवणार्‍या स्वराज्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ छत्रपती संभाजी राजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा...


Reference - 

Sambhaji Book by Vishwas Patil
Internet
Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 12:05 PM | No comments

गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिप्रदा म्हणजे ‘गुढीपाडवा’ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे नव-संवत्सराचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहीला-वहीला दिवस आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त. पुराणात आणि आपल्या हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहुर्त सांगितले आहेत.
 
१. अक्षय तृतीया
२. विजयादशमी (दसरा)
३. गुढीपाडवा हे तीन मुहूर्त आणि,
४. बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त
 
कोणतेही पवित्र कार्य करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. "चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या दिवशी करावी..." हे बहुदा यासाठीच म्हटले जात असावे. अनेक जण या गुढीपाडव्याचा पवित्र दिवशी शुभ संकल्प करतात. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान आटपून घरोघरी, दारात उंच गुढी उभारुन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. आता आपण ही गुढी उभारण्यामागच्या कारणाविषयी जाणून घेऊ.

ब्रम्हदेव, ज्याने अखिल सृष्टीची निर्मिती केली, त्यांनी ह्या चैत्र शुद्ध प्रतिप्रदेदिवशी सृष्टीरचनेस आरंभ केला असे मानले जाते. याच दिवशी रघुकुलनायक प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकाधिपती दृष्ट रावणाचा आणि इतर राक्षसांचा बिमोड करुन, त्यांना मारुन आणि वनवास संपवून पुन्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला. समस्त अयोध्यावासियांनी प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत दारात ‘गुढ्या’, ‘तोरणं’ ऊभारुन आणि ‘रांगोळ्या’ काढून केले.

गौतमीपुत्र शातकर्णी उर्फ
शालिवाहन याने ह्या दिवशी ‘शक’ राजांचा युद्धात पराभव केला होता. या शालिवाहन राजाच्या काळात नवीन कालगणनेला सुरुवात झाली, ही कालगणना ‘शालिवाहन शक’ म्हणून ओळखली जाते. ह्या दिवसापासून ‘चैत्र नवरात्रीला’ सुरुवात होते. नवरात्रीत अनेक जण घरी घट बसवितात. या नवरात्रीमध्ये आदिमाता महिषासुरमर्दिनीची उपासना आणि पूजन करणे श्रेष्ठ मानले जाते. ‘रामनवमीला’ रामजन्म उत्सव साजरा केला जातो आणि सर्वांना सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. रामनवमीला अशुभाच्या नाशासाठी, आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या आशिर्वादाने माता कौसल्येच्या पोटी प्रभू ‘श्रीरामचंद्रांनी’ जन्म घेतला, ही नवरात्री ‘शुभंकरा नवरात्री’ म्हणून देखील ओळखली जाते. नववर्षाच्या सुरुवातीला ह्या तीनही सणांच्या त्रिवेणी संगमाने एक वेगळेच चैतन्य सकल सृष्टीत येते. वसंत ऋतूची चाहूल चैत्राच्या नवपालवीत अधिकाधिक भर टाकत असते. जणू सर्व निसर्गच नववर्षाचे स्वागत करायला नवीन वस्त्रे परिधान करुन तयार असतो.
गुढी
गुढी आणि पंचांग पूजन
गुढी म्हणजे ‘मांगल्याचे’, ‘विजयाचे’ आणि ‘आनंदाचे’ प्रतिक. गुढी उभारताना, एका उंच काठीच्या टोकाला स्वच्छ रेशमी वस्त्र बांधले जाते. त्यावर कडुलिंब आणि आंब्याची डहाळी बांधून त्यावर ‘तांब्या’ किंवा ‘चांदीचा’ गडू (कलश) उपडी ठेवला जातो. त्या गडूवर, कुंकवाने ‘ॐ’ किंवा ‘स्वस्तिक’ हे मंगल चिन्ह काढून गुढीला साखरेच्या गाठींची माळा आणि फुलांचा हार घातला जातो. त्यानंतर गुढी उभारायची जागा स्वच्छ करुन उंच गुढी उभारली जाते. मग हळद कुंकू, अक्षता व फुले वाहून गुढीची मनोभावे पुजा करण्यात येते व गुढी समोर दिवा ठेवून गुढीला नैवेद्य अर्पण केला जातो. आपली तसेच आपल्या प्रियजनांची भरभराट होऊन, त्यांना जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गुढी सारखे उत्तुंग यश मिळावे म्हणून साकडे घातले जाते. नंतर कडुलिंबाच्या पानांचा रसतीर्थ’ म्हणून प्राशन केला जातो. घरोघरी पंचपक्वानांचा बेत करुन देवाला गोड-धोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो.

शोभायात्रा - ढोल ताशा पथकं
जुन्या साहसी खेळांचे प्रात्याक्षिक
गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने हा दिवस नवीन वस्तू, सुवर्ण खरेदी आणि नवीन कामकाज वा उद्योग सुरु करण्यासाठी खुप चांगला मानला जातो. गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी हिंदू संस्कृतीची जपणूक म्हणून शोभायात्रा काढल्या जातात. लेझीम, झांज, ध्वजपथकं ढोल ताशांच्या तालावर पावलं थिरकताना तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेले असते. लहान थोर सर्व जण पारंपारिक वेषात या शोभायात्रेत उत्साहाने सामिल होतात तर काही जण शिवाजीराजे, झाशीची राणी अशा अनेक शूर-वीरांचे पोशाख परिधान करुन यात्रेची शोभा वाढवीत असतात. तलवारबाजी, दांड्पट्टा, लाठीकाठी अश्या अनेक जुन्या साहसी खेळांचे प्रात्याक्षिक या शोभायात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

शोभायात्रेत नटलेली मंडळी - १
शोभायात्रेत नटलेली मंडळी -
गुढीपाडवा सण हिंदू वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात, उत्साहात करुन देतो आणि संपूर्ण वर्ष आनंद साजरा करायला अनेक सण आणि उत्सवांची खैरात घेऊन योतो. आपण या प्रत्येकाने या सण आणि उत्सवात प्रेमाने सहभाग घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीची आणि मुल्यांची जपणूक केलीच पाहीजे.