Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 1:17 PM | No comments

होळी रे होळी...

फाल्गुन पौर्णिमा म्हणजे ‘होळी पौर्णिमा’... रंगांचा, चैतन्याचा, स्फूर्ती, आनंद देणारा आणि हिंदू संस्कृतील हा एक महत्वाचा सण. संपूर्ण भारतात अत्यंत आनंदात आणि उत्साहात  हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत असे ५/६ दिवस तर काही ठिकाणी दोन दिवस हा सण साजरा केला जातो. कोकणात हा सण ‘शिमगा’ ह्या नावाने ओळखला जातो.




होळीच्या दिवशी झाडाच्या सुकलेल्या फांद्या, लाकडे आणि पालापाचोळा एकत्र करुन त्यांना जाळण्याची प्रथा आहे. होळीच्या दिवशी जूनी-जाणती मंडळीं अडीअडचणी, संकटं दूर व्हावीत म्हणून देवाला गार्‍हाणे घालतात, आणि उपस्थित सगळे ‘होय महाराजा...’ म्हणत देवाला आळवणी करतात. नंतर होळी प्रज्वलित करून साखर-खोबर्‍याचा प्रसाद वाटला जातो. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. शिमग्याच्या दुसर्‍या दिवशी ‘धुलिवंदन’ म्हणजे
धुळवड खेळली जाते. अनेक जण मित्र मंडळी, आप्तजन यांना रंग लावून रंगांची उधळण करतात. ह्या दिवशी सारा गोतावळा एकत्र येतो; खरचं आपले हे सण आपल्या माणसांना एकत्र आणतात, एकमेकांशी जोडतात. ‘आयना का बायना... घेतल्या शिवाय जायना...’ असे म्हणत बच्चेकंपनी घरोघरी जाऊन गाणी गात पैसे गोळा करण्यासाठी पुढे असतात. कोकणात हे सोंगं ह्या नावाने ओळखले जाते.


अगदी पुराणांतही होळी पौर्णिमेचा संदर्भ सापडतो. ‘प्रल्हाद’ हा भगवान विष्णुचा निस्सिम भक्त. त्याचा पिता असणारा दैत्य ‘हिरण्यकषपू’ ला प्रल्हाद करित असलेल्या पवित्र विष्णुभक्तीची चीड येत असे. आपल्या पेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही ह्याचा हिरण्यकषपूला माज होता. प्रल्हादाला मारण्याकरीता ह्याने अनेक उपाय केले, पण प्रत्येकवेळी विष्णुकृपेने तो वाचला. एकदा हिरण्यकषपूने ‘होलिका’ नामक राक्षसीला पाचारण केले. होलिकेकडे असा वर होता की अग्नी तिला जाळू शकणार नाही. त्यामुळे भक्त प्रल्हादाला घेऊन होलिका अग्नीमध्ये प्रवेश करते; परंतु भगवान विष्णुच्या कृपेने स्वतः होलिका अग्नीत जळून जाते पण भक्त प्रल्हादाला जराही इजा होत नाही. 



ह्या पौर्णिमेच्या दिवशीच भगवान विष्णुने होलिका राक्षसीचा वध केला. ‘अग्नी’ अपवित्र आणि वाईटाचा नाश करते तर पावित्र्याला अनंत पटींनी उजळून काढते. म्हणून होळीला ह्या होलिकेची राख-रांगोळी करणार्‍या ‘अग्नी’ देवतेची पूजा केली जाते.

होळी पौर्णिमेनंतर झाडांची जुनी पानं गळून त्यांना चैत्राची नवीन पालवी फुटते, निसर्ग चैतन्याने बहरुन येतो. त्याचप्रमाणे आपणही काम, क्रोध आदी षड्‌रिपु आणि चुकीच्या तसेच वाईट गोष्टी होळीत दहन करुन चांगल्या संकल्पाची सुरुवात करुन आपल्या जीवनाची पालवी नक्कीच बहरवू शकतो. काय मग, करुया ना होळीला रंगांची उधळण?...

0 comments:

Post a Comment