सध्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे वारे वाहत आहेत. दरवर्षी विंबल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन, यु.एस्. ओपन व फ्रेंच ओपन या चार मानाच्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा खेळविण्यात येतात. त्यातील या वर्षातील पहिली मानाची ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन. ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात ‘मेलबर्न’ शहरातील ‘मेलबर्न पार्क’ ह्या टेनिस संकुलामध्ये खेळविण्यात येते. सन १९०५ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळविण्यात आली. सन १९८७ साला पर्यंत गवताच्या टेनिस कोर्ट वर ही स्पर्धा खेळविण्यात येत होती, परंतु १९८८ साला पासून हार्ड कोर्ट वर ही खेळविण्यात येते.
ऑस्ट्रेलियन ओपन ही खालील गटांतर्गत खेळविण्यात येते.
१. पुरुष / महिला एकेरी
२. दुहेरी
३. मिश्र दुहेरी
४. मुले, मुली
५. व्हीलचेअर
ऑस्ट्रेलियन ओपन ही खुली स्पर्धा होण्या अगोदर ‘रॉय एमरसन’ या ऑस्ट्रेलियन टेनिसपटूने तब्बल सहा वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याचा मान मिळविला आहे. तर सन १९६९ सालानंतर ही खुली स्पर्धा झाल्यावर अमेरिकेच्या ‘आंध्रे आगासी’ व स्विर्त्झलॅंडच्या ‘रॉजर फेडरर’ या दोघांनी तब्बल चार वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावला आहे. गेल्या वर्षी सर्बियाचा ‘नोव्हॅक जोकोविच’ ह्याने स्पेनच्या ‘राफाएल नादाल’ ह्याला हरवून पुरुष एकेरी गटात विजयी होण्याचा मान पटकावला होता. तर महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या ‘व्हिक्टोरिया अझारेन्का’ हिने रशियाच्या ‘मारिया शारापोवा’ हिला पराभूत केले होते. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या ‘रॉडेक स्टेपनेक’ व भारताच्या ‘लिएंडर पेस’ ह्यांनी अमेरिकेच्या ‘ब्रायन बंधूंवर’ विजय मिळवला तर मिश्र दुहेरीत रशियाच्या ‘एलेना व्हेस्निना’ व भारताच्या ‘लिएंडर पेस’ ह्यांना उपविजेते पदावर समाधान मानवे लागले.
यंदा स्विर्त्झलॅंडच्या ‘रॉजर फेडरर’ हा पाच वेळा ही स्पर्धा जिंकून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे तर सर्बियाचा ‘नोव्हॅक जोकोविच’ हा हॅट्रीक करण्यास उत्सुख आहे. महिलांमध्ये रशियाची ‘मारिया शारापोवा’ व अमेरिकेची ‘सेरेना विलियम्स्’ ह्या चमक दाखवत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ‘मार्गारेट कोर्ट’ नंतर अमेरिकेची ‘सेरेना विलियम्स्’ ही जास्त वेळा ही स्पर्धा जिंकण्यास उत्सुख आहे. भारताचा ‘महेश भूपती’ हा सुध्दा यंदाच्या मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. येत्या काही दिवसातच ह्या स्पर्धेचे अंतिम निकाल स्पष्ट होतील.
0 comments:
Post a Comment