Posted by Vinayak H. Katwankar. Posted on 5:05 PM | No comments

२. मी अनिरुध्द आहे !


परमपूज्य अनिरुद्ध बापू (डॉ. अनिरुद्ध धै. जोशी) ह्यांचा दै. प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ (अनिरुद्ध पौर्णिमा) रोजी प्रकाशित झालेला अग्रलेख.

स्वतःच्याच पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित होणाऱ्या दैनिकाच्या विशेष आवृत्तीतील अग्रलेख आणि तोही स्वतःवरच लिहिणारा, बहुधा मी एकमेव कार्यकारी संपादक असावा. माझी माई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, " हा नं काय करील त्याचा कधी पत्ता लागत नाही, " तर माझी आई मला 'चक्रमादित्य चमत्कार' म्हणायची. बहुतेककरून माझ्या बालपणीच्या ह्या चक्रमपणाचाच विकास कायम होत राहिला आहे. प्रत्येकाला शालेय शिक्षणानंतर अगदी कुठलाही पाढा आठवला नाही तरी 'मी एके मी ते मी दाहे मी' हा पाढा सहजतेने येत असतो. कारण हा 'मी' दाही दिशांना मनाच्या घोड्यावर बसून पाहिजे तेव्हा पाहिजे तसा उधळू शकतो. मी असा आहे आणि मी तसा आहे, मी काही असा नाही आही मी काही तसा नाही, मला हे हवे आणि मला ते नको, मी हे केले आणि मी ते केले, अशा अनेक रुपांनी हा प्रत्येकाचा 'मी' जीवनभर धिंगाणा घालत राहतो आणि हा अनिरुद्ध तर लहान मुलांच्या 'धांगडधिंगा' शिबिराचा खंदा समर्थक. मग ह्या अनिरुद्धाचा 'मी' स्वस्थ थोडाच बसणार?

मी असा आहे आणि मी तसा आहे -
     मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे. पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे? ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱया त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवरदेखिल अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती.

मी चांगला आहे की वाईट आहे -
     हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरु आणि माझी गायत्रीमाता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे.

मी काही असा नाही मी काही तसा नाही -
मी कसा नाही, कुठे नाही आणि कधी नाही हे मात्र मला खरच माहीत नाही पण मी कशात नाही हे मात्र मला नीट माहीत आहे व हाच माझ्या प्रत्येक वाटचालीतील प्रकाश आहे.

मला हे हवे आणि मला ते नको -
     मला भक्तकारण हवे आणि राजकारण नको, मला सेवा करावयास हवी पण कुठलेही पद नको, मला मित्रांच्या प्रेमाचे सिंहासन हवे पण सत्ता नको, मला अहिंसा हवी पण दुबळेपणा नको, मला सर्वसमर्थता हवी पण शोषण नको, बल हवे पण हिंसा नको, मला परमेश्वराच्या प्रत्येक भक्ताचे दास्यत्व मी स्वीकारणे हवेहवेसे तर दांभिक ढोंगबाजी व खुळचट श्रद्धांचे (?) नायकत्व नको.

     अनेकांना मी कुणालाही भेटायला जात नाही म्हणुन माझा राग येतो. परंतु मला कुणाकडूनही काही द्यायचेही नाही. मग कुणालाही भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे ? मी भेटतो फक्त माझ्या मित्रांना कारण 'आप्तसबंध' म्हणजेच देण्याघेण्याशिवायची आपुलकी हे एकमेव मला भेटीसाठी कारण असते, म्हणून मला निर्व्याज आपुलकीची भेटगाठ हवी, पण देण्याघेण्याची किंवा विचारमंथनांची भेटगाठ नको असते. मला ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचे पोकळ शब्द व देखावे नकोत पण मला परिश्रमपूर्वक ज्ञानाचा रचनात्मक कार्यासाठी होणारा निःस्वार्थ विनियोग हवा असतो.

मी हे केले आणि मी ते केले -
     'मी काहीच करत नाही, ना-मी सर्वकाही करत असतो' ही माझी अंतिम श्रद्धा आहे. मग हा माझा 'मी' स्वस्थ बसून निष्क्रिय आहे काय? ते तर मुळीच नाही. या अनिरुद्धाचा 'मी' त्या 'ना-मी' च्या प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनप्रवाहाला पहात राहतो आणि त्या प्रवाहाची गती थांबणार नाही व पात्र कोरडे होणार नाही, ह्याची काळजी घेण्यासाठी त्या 'ना-मी' चा स्त्रोत त्याच्याच प्रेमाने श्रद्धावानाच्या जीवननदीच्या कुठल्याही डोहाला फोडून सतत प्रवाहित राहण्यासाठी ओतत राहतो. मला सांगा, ह्यात माझे काय?

     सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणि दुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे; ह्याचाच अर्थ, हे कार्यदेखील आपोआपच घडत असते. कारण जो स्व-भाव आहे तो आपोआपच कार्य करीत राहतो, त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही.

     प्रभुरामचंद्रांचा मर्यादायोग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्रीसाईनाथांचा मर्यादाधिष्टित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधीलकी 'वास्तवाशी' म्हणजेच स्थूल सत्याशी नसून, ज्याच्यात पावित्र्य उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे.

मला काय करायचे आहे? मी काय करणार आहे? मी अग्रलेख का लिहितो आहे? तिसऱया महायुद्धाविषयी एवढे मी का लिहितो आहे? मी प्रवचन का करतो आहे? ह्याचे उत्तर माझी ह्रदयक्रिया कशी चालते व मी श्वास कसा घेतो ह्यांइतकेच सोपे आहे, खरे म्हणजे तेच उत्तर आहे.

     माझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या दोन नाण्यांना मी विकला जातो, बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे, ह्या अनिरुद्धाचा 'मी' फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणि कधीही नसेल.
मित्रांचा मित्र,

0 comments:

Post a Comment